संबंधित बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार
नागपूर : पावसामुळे गेल्यावर्षी एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान शेतपिकांचे आणि फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर सरकारने ११० कोटी नऊ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पावसात नुकसान झालेल्या शेतकर्यांना यंदाच्या पावसात मदत मिळणार आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना आणि फळबागांनाच ही मदत दिली जाणार आहे.
एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना फळपिकांचे आणि शेतपिकांचे नुकसान झाल्यामुले मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार गेल्या महिन्यात मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर मंगळवारी शासनाने ११० कोटी रूपयांची मदत देत असल्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे. या कालावधीतील शेतपिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे पंचनामे तलाठी, अथवा कृषी अधिकार्यांनी केले होते. त्याचा आढावा घेऊनच ही मदत जाहीर करण्यात आली आहे, मदतीची रक्कम संबंधित बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
कोणत्याही बाधितांना रोख अथवा निविष्ठांच्या स्वरूपात ही रक्कम देण्यात येणार नाही. पिकांच्या झालेल्या नुकसानीकरीता ही रक्कम शेतकर्यांना दिली जात असल्याने ही रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली या रक्कमेतून करू नये, असा इशाराही सरकारने बँकांना दिला आहे. या रक्कमेचे पूर्ण वाटप झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकर्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. बाधित शेतकर्यांच्या बॅक खात्यावर रक्कम हस्तांतरित करताना आधार क्रमांकाशी जोडून हे हस्तांतरण करण्यात यावे, मात्र एखाद्या शेतकर्याकडे आधार क्रमांक नसेल तर पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र अथवा आधार नोंदणी पावती ग्राह्य धरावी, असे निर्देशही सरकारने या शासन निर्णयात जाहीर केले आहेत.