पावसाच्या भीतीने डकलाइनमधील रहिवासी रात्र काढतात जागून

0

मुंबई (निलेश मोरे) । 2017 च्या मे महिन्यामध्ये मुंबई महापालिकेने तानसा पाइपलाइन येथील हजारो झोपड्या निष्कासित केल्या होत्या. तोडलेल्या झोपड्यांचे डेब्रिज व कारवाई करताना झोपड्यांसाठी असलेल्या जुन्या संरक्षण भिंती कोसळल्याने गतवर्षी पावसात डकलाइन येथील अष्टविनायक सोसायटीमधील 8 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यात त्या घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षी पावसाळ्यात डकलाइन ते कातोडीपाडा येथील राहिवाशानी संरक्षण भिंत बांधून देण्याची मागणी केली होती. त्यावेळेस पालिकेच्या मुख्य अभियंत्यांनी डकलाइन येथील जागेची पाहणी करून संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र, ते काम अर्धवट राहिल्याने यंदा 2018 मध्येही पावसाळ्यापूर्वी हे काम होऊ न शकल्याने डकलाइन येथील अष्टविनायक सोसायटी, कल्पवृक्ष सोसायटी, विकास सोसायटीमधील रहिवासी पूर्णपणे भयभीत झाले आहेत. संरक्षण भिंत नसलेल्या डकलाइन येथील 4 ते 5 सोसायटीमधील रहिवासी पावसाच्या भीतीने रात्र जागून काढत आहेत.

शुक्रवार, 8 जून रोजी रात्री पावसाच्या संततधारेने येथील अष्टविनायक सोसायटी, विकास सोसायटी आणि कल्पवृक्ष सोसायटीमध्ये पावसाच्या वाहत्या पाण्याच्या वेगाने मातीचे ढीग घरामध्ये जाऊन रहिवाशांनी कालची संपूर्ण रात्र जागून काढली. याबाबत डकलाईन येथील नामदेव रिंगे यांनी सांगितले की गेल्यावर्षी पावसाळ्यात येथील 8 घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले होते. पालिकेने संरक्षण भिंतीचे काम अर्धवट सोडले आहे. भिंतीचे काम पूर्ण न झाल्याने यंदाही मातीचे डेब्रिज घरामध्ये शिरत आहे. दगड, मातीमुळे घरावर भार पडून घरे कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे यंदा सोसायटीमधील प्रत्येक राहिवाशाला सावध राहून रात्र जागून काढावी लागत आहे. याप्रकरणी पालिका उपअभियंता जगदीश चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने काम संथगतीने सुरू असल्याचे सांगितले तसेच दरवर्षी आम्ही रहिवाशांना याबाबत रीतसर नोटीस बजावतो असतो, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे.