पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात

0

जळगाव ।  यंदाच्या मान्सून हंगामात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र तो साफ चुकीचा ठरला आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा आणि जुलै महिन्यातील पहिला पंधरवडा वगळता समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले त्यानंतर लागवड झालेल्या पिकांची वाढ समाधानकारक पध्दतीने झाली नाही. मान्सुच्या सुरुवातीपासूनच अनियमित पाऊस राहिलेला आहे. जिल्ह्यासह राज्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन आठवड्यापुर्वी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पावसाचा फटका सुरु होता त्यामुळे पिक तग धरुन होती. पिका पुरता आवश्यक असलेल्या पावसानेही दडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंतेत वाढ झाली आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपाचे पीक धोक्यात आले आहे. पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस नसल्याने पिकांची वाढत तर खुटंलींच, सोबतच मुग, उडीद, चवळी, सोयाबीन आदी हातात आलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊस गायब झाल्याने कडधान्याच्या पीकावर अधिक परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

तुर्त दहा दिवस पाऊस लांबला: अरबी समुद्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने पाऊस लांबला आहे. त्यात 20 ऑगस्ट पर्यत पाऊस पडणार नसल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविला आहे त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार तुर्त तरी दहा दिवस पाऊस येणार नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीपासून जोरदार पाऊस झालेला नसल्याने खरीप पिकांमध्ये तग प्रतिकारक शक्ती कमी आहे.

दुष्काळाची भिती
गेल्या दोन तीन वर्षापासून सततच्या कमी पाऊसामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती होती. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी दुष्काळाचे सावट दुर होईल असे वाटत होते. मात्र अद्यापही जोरदार पाऊस झालेला नसल्याने पाणीसाठी अत्यल्प आहे. त्यामुळे यावर्षीही दुष्काळ ओढवेल अशी भिती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस झालेला नसल्याने अद्यापही पाणीसाठा वाढलेला नाही. पाणीसाठा नसल्याने विहीरी, कुपनलीका यांच्यामधील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे तिव्र पाणीटंचाई जाणवायला लागली असून जिल्ह्यातभर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

अमळनेर तालुक्यातील पीके करपली
शिरुडसह मंगरूळ, फापोरे, कावपीप्री, इंदापिप्रि शिवारात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने उन्हामुळे पिके करपू लागले आहे. रिमझिम पाऊस झाल्याने पिके तग धरुन उभी होती. जमिनी ह्या हलक्या प्रतीच्या असल्याकारणाने त्यात घेण्यात येणारे पीक हे पाण्याशिवाय जास्त दिवस जगू शकत नाहीत. गेल्या 15 दिवसापासून पडत असलेला रिमझिम पाऊस ही बंद झाल्याने जमिनी कोरड्या होऊन जमिनीतील ओलावा नाहीसा झाल्याने त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही

वातावरणाचा दुष्परिणाम
गेल्या पंधरवड्यातील पाऊस यानंतर ढगाळ, विषम वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीनवर अळी, बागायती कापसावर मर रोग, उडीद मुगावरील पाने कुरतडणार्‍या अळ्या, कापसावर मावा, तुडतुडे, भुंगेरे आदींचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागायती कापसाला बोड लागण्यास सुरुवात झाली आहे मात्र पाण्या अभावी बोड गळती होत आहे. रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी महागड्या किंमतीची फवारणी करत आहे. आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असतांना आणि पावसाने दडी मारल्याने खर्च करणे शेतकर्‍यांसाठी अवघड बनले आहे. हाताशी हालेले पिक वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हताश झाला आहे.