पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी

0

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. पहाटेपासूनच जोरदार पावस सुरू असल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाची स्थिती पाहता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही पावसानं मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईत 24 तासांत 182 मिलीमीटर पाऊस झाल्याचे कुलाबा वेध शाळेने सांगितले आहे तर सांताक्रुझ वेध शाळेमध्ये 137 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.