पावसामुळे राज्य कबड्डीची फायनल 20 डिसेंबरला

0

कराड । ओखी वादळामुळे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका कराड येथील राज्य कबड्डी स्पर्धेलाही बसला आहे. पावसाच्या गोंधळामुळे या स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता अंतिम दिवशी होणारा पुरुषांचा उपांत्य फेरीचा अर्धवट झालेला सामना आणि त्यानंतर होणारे दोन्ही गटातील अंतिम सामने आता थेट 16 दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबरला कराडमध्येच खेळविले जातील. 21 तारखेपासून याचठिकाणी राष्ट्रीय कबड्डीसाठी राज्याचे शिबिर सुरू होणार असल्यामुळे त्याआधी हे अंतिम सामने खेळविण्यात येणार आहेत.

सर्व संघांचे रेल्वे बुकिंग अंतिम सामन्यानुसार करण्यात आले होते. पण अंतिम सामनेच होऊ न शकल्याने संघांना आणखी एक दिवस थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे शेवटी सामनेच पुढे ढकलण्यात आले. कराड-सातारा येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील यशवंतराव चव्हाण क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या गटात सांगली व कोल्हापूर यांच्यातील उपांत्य सामना 24-23 असा सुरू होता आणि चार मिनिटे शिल्लक होती. तेव्हाच पावसाचे जोरदार आगमन झाले आणि नंतर सामनेच होऊ शकले नाहीत. याच गटात पुण्याने अंतिम फेरीत आधीच धडक मारली होती. महिलांमध्ये उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने कोल्हापूरचे आव्हान 40-16 असे सहज संपुष्टात आणले. महिला गटात मुंबई उपनगर आणि गतविजेते पुणे यांच्यात विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे. पुरुषांमध्ये पुण्याने ठाण्याचा 29-27 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे तर सांगली आणि कोल्हापूर यांच्यातील विजेता संघ पुण्याशी भिडणार आहे.