पावसामुळे शिरगावात मशागतीच्या कामाला वेग

0

तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा

शिरगाव : शिरगाव, साळूंब्रे, दारूंब्रे, सांगवडे, गोडूंब्रे, गहुंजे आदी गावातील शेतकर्‍यांनी सध्या सर्व कामे बाजूला ठेवून शेतीच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले आहे. तर काही ठिकाणी सर्व कामे करून पावसाची प्रतीक्षा होते असल्याचे चित्र या परिसरात दिसते आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच म्हणजे मागच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने या परिसरात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी तर भात लावणीची संपूर्ण तयारी देखील झाली आहे तर काही ठिकाणी भाताचे रोपे टाकली आहेत. परंतु या आठवड्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी रोप टाकावे ही नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या आठवड्यात पाऊस नाही तोपर्यंत भुईमुग काढून ते शेतदेखील भात लावणी करण्यासाठी घाई करावी लागत आहे असे काही शेतकर्‍यांनी सांगितले.

आता प्रतिक्षा पावसाची
आता टाकलेले रोप जर या आठवड्यात पाऊस आला तर चांगले येईल. नाही टाकले अन् पाऊस आला तर टाकायला आणखी काही दिवस उशीर होईल. त्यामुळे टाकावे की नाही या विचारात शेतकरी पडले आहेत. जर रोप टाकायला पुन्हा उशीर झाला तर ते त्या रोपाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, असा समाज या भागातील शेतकर्‍यांमध्ये आहे. पावसाच्या पाण्यावरच आलेले रोप जास्त चांगले उत्पन्न देते असेही काही शेतकरी सांगतात. ज्यांच्याकडे पावसाशिवाय पाण्याचा दुसरा पर्यायी स्त्रोत आहे अशा शेतकर्‍यांनी भाताचे रोपे टाकली आहेत. त्यांना आता प्रतीक्षा आहे ती फक्त पावसाची. शिवाय काहींनी वखरणी, कुळवणी, नांगरलेल्या शेतातील ढेकळे फुटावे यासाठी ट्रॅक्टरने कुळवणी करून घेतली आहे. त्यामुळे आता पाऊस पडण्याआधी ढेकळे जिरून काळीशार झाली आहेत. त्यामुळे आता फक्त पाऊस पडला पेरणी करणे बाकी राहिले आहे.

पुढारींचीदेखील शेतीकामांची लगबग
या भागातील काही पुढारी शेतकर्‍यांनीसुद्धा आता शेतीची कामे प्रथम आणि मगच नंतर दुसरी पुढारकीची कामे असा पवित्रा घेतला असल्याचे दिसते आहे. हे पुढारी उठल्या-उठल्या शेतात चक्कर मारूनच मग दिवसभराचे नियोजन करून घराबाहेर पडत आहेत. यावरून लक्षात येते की, एरवी जरी पुढारी म्हणून मिरवत असले तरी तेही प्रथम शेतीची कामांना प्राधान्य देतात. एकंदरीतच शिरगाव आणि परिसरातील शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व कामाला प्रथम प्राधान्य देवून कामाची लगबग चालू केली आहे. तर काही ठिकाणी सर्व मशागत करून पावसाची वाट पाहतानाचे चित्र या परिसरात तयार झाले असल्याचे जाणवते.