पावसाळापूर्व विकासकामांबाबत नगरपालिका होतेय जागरूक

0

शहादा । येथील नगरपालिकेमार्फत विविध विभागांमार्फत पावसाळयापूर्वी वेगवेगळी विकासकामे युद्धपातळीवर सुरू करून आवश्यक प्रकल्प मार्गी लावण्याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष असून योजनेसंदर्भात प्रलंबित असलेले तसेच नागरी समस्यांच्या दृष्टीने आवश्यक त्या विभागांतर्गत दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. याकामी न.पा.विभागाच्या आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा तसेच बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह कर्मचारी वर्ग जोमाने काम करीत आहे.

विविध भागात विद्युतीकरणावर भर
सध्या पवित्र रमजान महिना सुरु आहे. शहरातील गरीब नवाज कॉलनी, कुकडेल परिसरात विद्युतीकरण सुरु आहे. ज्या भागात लाईट नाहीत त्या ठिकाणी लाईट लावून सोय करण्यात येत आहे. पावसाळ्यात एलईडी लाईट ख़राब होवू नयेत म्हणून त्यांची दुरुस्ती हाइड्रोलिक वाहन आणून दुरुस्ती केली जात आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत् पर्यवेक्षक संदीप चौधरी, रतिलाल सोनवणे व पालिकेच्या विद्युत् विभाग काम करीत आहे.

विद्युत पर्यवेक्षकांची देखरेख
पावसाळ्यात येणार्‍या आपत्ती निवारण्यासाठी प्रत्येक विभाग प्रयत्नशील असतो. शहादा नगरपालिकेचा विद्युत विभाग याबाबतीत आघाडीवर आहे. शहरात वेगवेगळ्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. सर्व शहरात एलईडी लाईट लावण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी लाईट नाहीत अशा ठिकाणी ट्यूब लाईट लावून उजेड करण्याचा प्रयत्न नगरपालिके मार्फत सुरु आहे यासाठी पालिकेचे विद्युत् पर्यवेक्षक संदीप चौधरी स्वतः हजर राहून कामाची देखरेख करीत आहे.