पावसाळ्यानंतर मुंबईतील 459 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची होणार डागडुजी

0

मुंबई । महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या रस्ते कामांपैकी जून 2017 पर्यंत 561 रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली आहेत. पावसाळ्यानंतर म्हणजेच येत्या ऑक्टोबरपासून 459.48 किमी लांबीच्या रस्त्यांवरील 1 हजार 668 कामे आणि जंक्शनची 112 कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 664 रस्त्यांची कामे आणि 59 जंक्शनची कामे प्रस्तावित करण्यात आली असून याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. कामाच्या आवश्यकतेनुसार 4 वर्गवारींमध्ये विभागण्यात आली आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली आहे.

जे रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात येणार आहेत, अशा रस्त्यांचा समावेश ’प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीत करण्यात आला आहे. यामध्ये 1449 कामांचा समावेश आहे. तसेच 158 जंक्शनचा देखील प्रकल्प कामांमध्ये समावेश आहे. यापैकी 344 रस्ते कामांची व 40 जंक्शनच्या कामांची पूर्तता पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली आहे. तर 835 कामे व जंक्शनची 112 कामे ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. उर्वरित 88.49 किमी लांबी असणार्‍या रस्त्यांच्या 270 ’प्रकल्प’ कामांसाठी निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये जंक्शनच्या 6 कामांचा देखील समावेश आहे. रस्त्यांचा पृष्ठभाग फार खराब झाल्याचे किंवा मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे आढळून आले आहे, अशा रस्त्यांच्या भागांचा समावेश ’प्राधान्यक्रम 1’ अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये साधारणपणे 112 रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

तात्काळ दुरुस्तीची गरज नसलेल्या कामांचा समावेश ’प्राधान्यक्रम 3’, यात 93.89 किमी लांबी असणार्‍या रस्त्यांवरील 394 कामांचा समावेश आहे. नजिकच्या काळात दुरुस्ती करणे आवश्यक होते, अशा कामांचा समावेश ’प्राधान्यक्रम 3’, यात 394 रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. सर्व 4 गटातील कामांची गॅरेंटी स्वीकारण्यात येणार आहे. प्रकल्प रस्त्यांसाठी गॅरेंटी तीन वर्षांची असणार आहे. तर प्राधान्यक्रम 1, 2 व 3 अंतर्गत असणा-या पुनर्पृष्ठीकरणाच्या कामांची गॅरेंटी दोन वर्षांची आहे. या कालावधीदरम्यान कामे झालेल्या भागात खड्डे उद्भवल्यास ते भरुन संबंधित रस्ता मोफत स्वरुपात सुस्थितीत करुन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे, अशीही माहिती चिठोरे यांनी दिली आहे.