उल्टा चोर कोतवाल को डाँटे…चुकीचे वर्तन तरीही मीच शिरजोर
प्रतिबंध केल्याने महिला पोलिस उपनिरीक्षकांवर खात्याकडून कारवाई
पिंपरी-चिंचवड : उल्टा चोर कोतवाल को डाँटे…असे म्हणण्याची वेळ एका महिला फौजदारावर आली आहे. कारण नाशिक उड्डाणपूलावर मध्यरात्री एक वाजता मित्र-मैत्रिणींसह दणक्यात वाढदिवस साजरा करणार्या पिंपरीच्या आमदार पुत्राला केवळ हटकल्याचे निमित्त झाले आणि खातेनिहाय कारवाईस सामोरे जावे लागले. शिवाय यापुढे लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट वर्तन करू नये, अशी सक्त ताकीदही मिळाली. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून पोलीस अधिकार्यांना अशा मानहानीकारक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याचे चर्चा पोलीस खात्यात सुरु आहे.
फौजदार रुपाली पाटील कहाणी
फौजदार रुपाली पाटील यांची ही कहाणी आहे. शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र-मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काही जण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास भररस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली असता, त्यांनी ग्रुपला हटकले. रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे काही करू नका, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या वेळी आमदारपुत्राने ‘मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाहीत’ असे पाटील यांनाच दटावले. पोलिसांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. यामुळे मुलांच्या पालकांशी संपर्क साधून ‘पोलीस ठाण्यात भेटा’ असा निरोप देत पाटील परतल्या.
कानफटात मारल्याचा झाला आरोप
या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाटील यांची तक्रार केली. तसेच मुलाच्या कानफटात मारली, असाही आरोप केला. 21 ऑक्टोबर 2017 ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली. तसेच पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. अशा कारवाईमुळे पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचे मनोबल खच्ची होते, अशी खंत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कासारवाडी येथे ऑक्टोबर 2017 मध्ये मुलाला वाढदिवस साजरा करताना, पोलीस अधिकारी महिलेने हटकले. उद्धट वर्तन केले. याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे या फौजदाराची तक्रार केली होती. किरकोळ प्रकार असल्याने त्याकडे नंतर दुर्लक्ष केले. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर पुढे काय झाले, याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आता काही सांगता येणार नाही.
-गौतम चाबुकस्वार, आमदार