पिंपरीत पाच लाखांच्या जुन्या नोटा जप्त

0

पिंपरी-चिंचवड : पुणे येथे एका 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच ऊर्से टोल नाका परिसरातही तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शनिवारी पिंपरीत एका 60 वर्षीय वृद्धाला पाच लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह पिंपरी पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. जवाहरलाल पहलाजमल गोगिया (वय 60, रा. एसएनबीपी शाळेजवळ, रहाटणी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. जुन्या नोटा बदलण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी वृद्धाला पकडले.

सापळा रचून पकडले
जवाहरलाल गोगिया शनिवारी त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जुन्या नोटा बदलण्यासाठी चिंचवडमधल्या एम्पायर इस्टेटजवळ हनुमान मंदिराजवळ येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचला. शनिवारी सायंकाळी सव्वा सहाच्या समारास जवाहरलाल हे त्याठिकाणी आले असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान, त्यांच्या दुचाकीची झडती घेण्यात आली. तेव्हा दुचाकीच्या डिक्कीत पाच लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. 500 रुपयांचे 10 बंडल असे पाच लाख रुपये व 70 हजार रुपयांची मोपेड दुचाकी, असा एकूण पाच लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही करवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, हवालदार नागनाथ लकडे, प्रभाकर खणसे, शाकीर जिनेडी, पोलीस शिपाई दादा धस, शैलेश मगर, संतोष भालेराव यांनी केली.