एकाच छताखाली उत्पादक-व्यवसायिक संवाद साधणार
पिंपरी चिंचवड : बीएनआय ग्रुप यांच्या वतीने पिंपरी टो क्लस्टर येथे 1 आणि 2 डिसेंबरला ‘मिलान्ज एक्सपो’ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बीएनआयच्या पिंपरी चिंचवड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक देवानंद देशमुख यांनी दिली. यावेळी, स्नेहल कोठारी, मनोज अगरवाल, भारत दिघे, विनीत बियाणी आदी उपस्थित होते.
प्रदर्शन सर्वांसाठी मोफत…
बीएनआयच्या वतीने पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड येथे ‘मिलान्ज एक्सपो’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रात असलेल्या जागतिक स्पर्धेमध्ये राज्यातील उद्योजक, व्यापार्यांना व्यवसाय वृध्दीसाठी मदत होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील उत्पादक आणि व्यवसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यात वाहन उत्पादकांपासून ते घरगुती साहित्य, उपकरणांसह विविध क्षेत्रातील सेवा आणि सल्लागार यांचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. या ठिकाणी विविध शाखेतील विद्यार्थी, गृहिणी, उद्योजक, व्यापारी व ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीएनआयच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध विषयांवर मार्गदर्शन…
या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (1 डिसेंबर) सकाळी 9.30 वाजता होणार आहे. इंडिया बिझनेसचे कार्यकारी अधिकारी अश्विनी माहेश्वरी, कार्पोरेट टे्रनर भुपेंद्र सिंग राठोर तसेच लेखक चंद्रशेखर टिळक हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी ई-वेस्ट संकलनही करण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार आणि कंपनी व्यवस्थापन यांचा थेट संपर्क व्हावा, या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.