पिंपरीत 150 वाहने चोरणार्‍याला अटक

0
चोर्‍या करून संसार आणि मुलांचे शिक्षणाचा भागवित होते खर्च
पिंपरी चिंचवड : दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरून संसार आणि मुलांचे शिक्षणाचा खर्च भागविणार्‍या एक अट्टल चोरट्याला वाकड पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलिसांनी 150 चारचाकी वाहने चोरणार्‍या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. राजू जावळकर (वय 50) आणि सोमनाथ चौधरी अशी या आरोपींची नावे असून दोघेही कार चोरी केल्यावर भंगारात विकायचे. यातून मिळणार्‍या पैशांमधून दोघेही संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवायचे.
पुणे, सातार्‍यातून चोरल्या गाड्या…
चिंचवडमध्ये राहणारा राजू बाबुराव जावळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर, पुणे आणि सातारा या परिसरात चारचाकी गाडी चोरी केल्याप्रकरणी जवळपास 150 गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता. तर त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी याच्यावर वाहनचोरीचे 25 गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राहटणी येथून छोटा हत्ती (चारचाकी गाडी) चोरली होती. त्याचा तपास वाकड पोलीस करत होते. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, छोटा हत्ती खेड शिवापूर येथे आहे. त्यानुसार त्यांचे पथक रवाना झाले, त्या ठिकाणी दोन्ही आरोपी हे गाडी कट करत होते. त्यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले.  कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. आत्तापर्यंत त्यांच्या चौकशीतून सात गुन्हे उघड झाले आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून वाहन चोरीचा धंदा…
राजू जावळकरला दोन मुले असून ते नेवासा येथील बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यासाठी राजू हा दरवर्षी दोघांची 80 हजार रुपये फी भरतो. तर पत्नी ही गृहिणी आहे. आई-वडील हे पुण्याजवळील एका खेड्यात राहतात. राजू हा गेली 20 वर्ष वाहनचोरीचे गुन्हे करत आहे. चार चाकी चोरुन ती भंगारात विकायचा. या पैशांमधून तो संसार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवित असे. राजू इयत्ता 7 वी पर्यंत शिकलेला असून कमी कष्टात जास्त पैसे कमावण्यासाठी तो चोरी करु लागला. दरम्यान, चोरी केलेल्या गाडीमध्ये जीपीएस सिस्टम तर नाही ना हे पाहण्यासाठी चोरी केलेली गाडी निर्जनस्थळी ठेवली जायची. तिथे दोन दिवस पोलीस किंवा गाडी मालक तर येत नाही ना याची खात्री करून ते गाडी भंगारात काढायचे.