पिंपरी -चिंचवड : शिवशाही बसला होणाऱ्या अपघाताची मालिका थांबतच नसून आज सकाळी पिंपरी -चिंचवडमध्ये शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. चालत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पिंपरीच्या कासारवाडी येथे ही घटना घडली. शिवाशाही बस भोसरी येथील सर्व्हिसिंग डेपोमधून शिवाजीनगर डेपोमध्ये चालली होती. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
शिवशाही बसमध्ये चालक एकटाच होता. बसमधून काही तरी जळाल्याचा वास आल्यामुळे बस चालकाने गाडी एका बाजूला घेतली आणि बाहेर पडला असता बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. या आगीमध्ये शिवशाही बसचा समोरचा भाग जळाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत बसची आग विझवली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.