2031 सालची लोकसंख्या लक्षात घेत पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळण्याचा प्रस्ताव
पाणी आरक्षणाच्या बैठकीत आमदारांनी केली मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहे. वाढता व्यवसाय आणि नोकर्यांच्या प्रमाणामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातून तसेच अन्य राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात लोक पिंपरी-चिंचवड शहराकडे आकर्षित होत आहेत. दिवसेंदिवस येथील नागरिकीकरण वाढते आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातून नागरिक येथे नोकरीसाठी, उद्योगासाठी येत आहे. औद्योगिक परिसर असल्याने येथे लोकांचे कामासाठी जास्त येणे आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात ही लोकसंख्या खूप वाढणार आहे हे नक्की. त्यामुळे 2031 सालची शहराची लोकसंख्या लक्षात घेता शहराला सध्या होत असलेला पाणी पुरवठा कमी पडणार आहे. त्यामुळे आत्ताच पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
ठोस उपाय योजनांची गरज
आमदार लांडगे यांनी पाणी आरक्षणाबाबत बैठक घेतली. या बैठकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य अभियंता जलसंपदा व सहसचिव संजय वेबसरे, माजी जलसंपदा मंत्री अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते. शहराची भविष्यातील तहान भागविण्यासाठी आत्ताच ठोस उपाय योजना करायला हवी. त्यासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी बैठकीत मांडली.
शहर झपाट्याने वाढते आहे
पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, डुडुळगाव, चर्होली या भाग इंद्रायणी नदीच्या खोर्यात येतो. या भागातील भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षण करणे आवश्यक आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवडकरांना कुठल्याही पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी ही मागणी करण्यात येत आहे. पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार आहेत.