पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरासाठी लवकरच स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा शुक्रवारी विधानसभेत गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केली. भाजपचे शहराध्यक्ष तथा आ. लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आ. शरद सोनावणे, आ. राहुल कुल यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 24 जुलैपासून सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी या मुद्यावर राज्य सरकारला साकडे घातले. राज्य सरकारच्यावतीने गृहराज्यमंत्र्यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. गृहविभागाच्या निर्देशानुसार पुणे पोलिस आयुक्तालयाने कार्यवाही करुन अहवालही सादर केला आहे.
हद्द निश्चितीबाबत विचार
नव्या पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महापालिकेसह, चाकण, तळेगाव दाभाडे या औद्योगिक पट्ट्याचाही समावेश होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयाचा प्राथमिक आराखडा तयार करून हद्द निश्चितीबाबतही विचार झाला आहे. पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 22 लाखांच्या जवळपास आहे. याशिवाय, चाकण, तळेगावचा विचार करता लोकसंख्या वाढीला वाव आहे. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी असून, वाहतूक आणि विशेष शाखेसह अन्य वरिष्ठ अधिकारी पुण्यातील आयुक्तालयातून काम पाहतात. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गुन्हेगारी, जमिनीचे वाद आणि अन्य कारणांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र आयुक्तालयाची नितांत गरज आहे.
मुख्यमंत्री आज घोषणा करणार?
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना गती मिळाली आहे. स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाबाबत यापूर्वीच घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि अन्य बाबींमुळे विलंब झाला आहे. उद्या, दि. 12 ऑगस्टला मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि स्थानिक प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या दौर्यात मुख्यमंत्री स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा करतील, अशी शक्यताही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.