बांधकाम व्यवसायाने मरगळ झटकली; व्यवहार सुरु
पिंपरी-चिंचवड : गेले वर्षभर अडचणीत सापडलेल्या बांधकाम व्यावसायात आता आर्थिक उलाढाली सुरु झाल्या असून, आर्थिक मंदीत सापडलेल्या या क्षेत्राने मरगळ झटकण्यास सुरुवात केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरात गतवर्षी 95 ते 97 हजार घरे-सदनिका विक्रीअभावी पडून होत्या. त्यांच्या खरेदी-विक्रीसही सुरुवात झाली असून, चालूवर्षात एक लाख 92 हजार सदनिकांची बांधकामे सुरु झाली असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना दिली आहे. रिअर इस्टेट क्षेत्रात पुणे हे देशात अद्यापही अव्वल असून, दिल्ली, मुंबईनंतर दरवर्षी सरासरी 3-7 टक्क्यांनी मालमत्तांच्या किमतीत वाढ होणारे हे शहर ठरले आहे. या दोन शहरात सद्या सरासरी 5200 ते 5500 प्रतिचौरस फूट दर सदनिका व घरांना मिळत असल्याचेही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
गतवर्षी बसला आर्थिकमंदीचा फटका
विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. तर पिंपरी-चिंचवड हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. या शहरांचा परिसर हा सरासरी 244 चौरस किलोमीटरइतका विस्तारित झाला असून, एकट्या पुणे शहराची लोकसंख्या अंदाजे तीन मिलियन इतकी झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी जवळ असल्याने या शहरातील मालमत्तांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शहराचा आर्थिक विकासदर (जीडीपी) हा देशातील दहा सर्वात श्रीमंत शहरापैकी सहाव्या स्थानावर आहे. तर जगातील नवव्या क्रमांकाचे हे उद्योजकीय शहर ठरले आहे. वर्ष 2016-17 हे आर्थिक वर्ष वगळता या शहरातील मालमत्तांच्या किमती सातत्याने वाढत्याच राहिलेल्या आहेत. गतवर्षी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले निर्णय आणि नोटाबंदी याचा सर्वाधिक फटका बांधकामक्षेत्राला बसला होता. त्यामुळे या क्षेत्रात आर्थिक मंदीची लाट आली होती. परिणामी, 95 ते 97 हजार सदनिका व घरे तयार होऊनही विक्रीस गेली नव्हती. आता मात्र केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर या घरांच्या खरेदी-विक्रीस सुरुवात झाली असून, आर्थिक मरगळ दूर होत असल्याची माहिती अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सलन्टचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी दिली.
परवडणारी घरे बांधण्यास सुरुवात!
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील परवडणार्या घरांच्या किमती सरासरी 40 लाखाच्या घरात पोहोचल्या असून, गेल्या 35 महिन्यातील ही सरासरी निचांकी किंमत असल्याचेही बांधकामतज्ज्ञांनी सांगितले आहे. गतवर्षीचा अनुभव व नजीकच्या काळात यापेक्षा जास्त किमतीची घरे खरेदी न करण्याची ग्राहकांची क्षमता लक्षात घेता, या परवडणार्या घरांच्या निर्मितीवर बांधकामक्षेत्राने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार 1.92 लाख घरे सद्या निर्माणाधिन असून, गतवर्षीपर्यंतची 95 ते 97 हजार सदनिका व घरेही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप विक्रीअभावी पडून आहे. नवीन घरे बांधताना कमी व परवडणार्या किमतीची बांधली जात असून, त्यामुळे त्यांची विक्री वाढेल, असा विश्वासही बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
1. 2017 मध्ये सदनिकांची विक्री न होण्याचे प्रमाण 5 ते 7 %
2. रेरा व जीएसटीनंतर ग्राहकांचा तयार सदनिका खरेदीकडे कल वाढला
3. 2017 पूर्वी 80 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची घरे खरेदीचे प्रमाण जास्त
4. नोटाबंदी, जीएसटीनंतर हेच प्रमाण 40 लाख व त्यापेक्षा कमी किमतीवर घसरले
5. 40 -80 लाख 43%, 80-1.50कोटी 11% तर 1.50 कोटीपेक्षा अधिक 3% खरेदीप्रमाण