सेवानिवृत्त सनदी अधिकारी शिवशंकर सिंग यांनी केले कौतूक
पिंपरी-चिंचवड : महापालिकेची करसंकलन प्रणाली उत्तम प्रकारची आहे. त्याचा अवलंब उत्तरप्रदेशातील महापालिकांमध्ये करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे मत उत्तरप्रदेश सरकारच्या नगरपालिका वित्तीय संसाधन विकास बोर्डाचे सदस्य व सेवानिवृत्त सनदी अधिकारी शिवशंकर सिंग यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन, पाणीपुरवठा व वित्त व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते. आयुक्त दालनात झालेल्या या बैठकीला सहआयुक्त दिलीप गावडे यांनी करसंकलन विभागाचे सादरीकरण करून या पथकाला माहिती दिली.
उत्तरप्रदेश सरकारला देऊ माहिती
मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी महापालिका अंदाजपत्रक व तरतुदीविषयी सादरीकरण केले. तर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी पाणीपुरवठा विभागाचे सादरीकरण केले. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी ई-गव्हर्नन्स व सारथी प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर सारथी प्रकल्पाची नागरिकांच्यासाठी उपयुक्तता असून, असा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केल्याबद्दल शिवशंकर सिंग यांनी प्रशंसा केली. उत्तरप्रदेश सरकारमध्येही याची माहिती देण्यात येणार असल्याचे सिंग म्हणाले.
यांचा होता पथकात समावेश
या पथकामध्ये उत्तरप्रदेश सरकारच्या नगरपालिका वित्तीय संसाधन विकास मंडळाचे सदस्य निवृत्त सनदी अधिकारी शिवशंकर सिंग, कृष्ण गोपाल यांचा समावेश होता. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत उपस्थित होते. या पथकाने सारथी, निगडी येथील सेंक्टर 23 जलशुध्दीकरण केंद्रातील स्काडा प्रणालीची माहिती जाणून घेतली.