पिंपरी-चिंचवड शिवसेना शहराध्यक्षपदी योगेश बाबर; गटबाजी उफळली!

0

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल

पिंपरी-चिंचवड : लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षनेतृत्वाने पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे. शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती दिली. या नियुक्तीनंतर शिवसेनेत जोरदार गटबाजी उफळून आली. शिवसेनेच्या 60 पदाधिकार्‍यांसह काही कार्यकर्त्यांनी तातडीने पिंपरीत बैठक घेऊन बाबर यांच्या नियुक्तीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. पक्षविरोधी कारवाया करणार्‍या गद्दाराच्या नेतृत्वाला शिवसैनिकांनी मान्य करायचे कसे? असा सवाल उपस्थित करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, शहरप्रमुखपदासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांची शिफारस केली होती. तर चिंचवडप्रमुख गजानन चिंचवडे यांच्याही नावाची शिफारस झाली होती. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा केल्यानंतर योगेश बाबर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. या नियुक्तीने शिवसेनेतील एक गट सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यात असल्याचेही सांगण्यात आले. ठाकरे यांनी ही निवड रद्द करण्याची मागणीही या गटाने केली आहे.

खा. बारणेंनी केली होती शिफारस!
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये संभाजीनगर-शाहू नगर भागातून योगेश बाबर यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, त्यांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्यावतीने पांडुरंग पाटील यांनी निवडणूक लढविली होती. परंतु, बाबर यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या उमेदवारासह स्वतः बाबर पराभूत झाले व तेथे भाजपचे तुषार हिंगे हे निवडून आले आहेत. वास्तविक पाहाता, पिंपरी विधानसभेचे प्रमुखपद असलेले बाबर यांना उमेदवारी मिळणे रास्त होते. तसेच, प्रत्यक्षात त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची मतेही घेतली होती. या बंडखोरीबद्दल पक्षाने त्यांच्यावर कारवाईही केली होती. दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बाबर यांच्या नावाची शहरप्रमुखपदासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवरून त्यांची शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. बाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी असून, त्यांचे वडिल मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविलेले आहे. दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिलेलेे आहेत. बाबर कुटुंबीय हे मूळचे साताराचे असून, पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेले आहे. खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून मनसेमार्गे भाजपशी सलगी साधल्याने त्यांना शह देण्यासाठीच त्यांचे पुतणे योगेश बाबर यांना शहरप्रमुखपद देण्यात आल्याची राजकीय चर्चा आहे.

पक्षप्रमुखांनी निवडीबद्दल फेरविचार करण्याची मागणी
मावळते शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी वाकड प्रभागातून तीन नगरसेवक निवडून आणले होते. शहरातून एकूण नऊ सदस्य निवडून आल्याने त्यांची वर्णी महापालिकेच्या गटनेतेपदी लागली होती. संघटनात्मक काम आणि महापालिकेतील गटनेतेपद अशा दोन्ही जबाबदार्‍यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी शहरप्रमुखपद अन्य पदाधिकार्‍यास द्यावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. जून महिन्यातील त्यांच्या या मागणीचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी शहरप्रमुखपदी अन्य व्यक्तीची निवड केली आहे. या पदासाठी खा. आढळराव यांनी सुलभा उबाळे, खा. बारणे यांनी योगेश बाबर यांच्या नावाची शिफारस केली होती. तर अन्य पदाधिकार्‍यांनी गजानन चिंचवडे यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. योगेश बाबर यांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक नाराजही होते. तसेच, गणेशोत्सवात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ देखावाही सादर केला होता. त्यामुळे ते भाजपात जाणार अशी चर्चाही रंगली होती. अशा भाजपधर्जिण्या व्यक्तीला शहरप्रमुखपद दिल्याने शिवसेनेतील एक मोठा गट नाराज झाला असून, पिंपरी येथे बैठक घेऊन त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तीबद्दल फेरविचार करण्याची मागणीही या गटाने केली आहे.