पिंपळगावच्या विवाहितेची आत्महत्या : तिघांविरोधात गुन्हा ; पतीला अटक

भुसावळ : तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील विवाहिता ज्योती अनिल सपकाळे (32) हिने शनिवार, 31 जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती मात्र माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, विवाहितेच्या चारीत्र्यावर संशय घेवून पतीसह सासू व नणंद हे मारहाण करीत त्रास देत असल्याने जाच असह्य झाल्यानेच विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप केल्याने तिघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सूर्यधन अंबादास कोळी (रींगाव, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार, पती अनिल वसंत सपकाळे, सासु शकुतला वंसत सपकाळे व नणंद योगीता गजानन सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत विवाहितेचा पती अनिल सपकाळे यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नावेद अली सैय्यद करीत आहेत.