पिंपळनेर शहरातील तीन बालकांचा डोहात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू
पोहण्याची हौस बेतली जीवावर : इंदिरा नगर भागात शोककळा
पिंपळनेर : पोहण्यासाठी गेलेल्या पिंपळनेर शहरातील तीन चिमुकल्यांचा डोहात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जेबापूर रस्त्यालगत असलेल्या बिजासनी रो-हाऊस जवळील डोहात घडली. या घटनेने पिंपळनेरच्या इंदिरा नगर भागात शोककळा पसरली आहे. नौमान मुख्तार शेख (16), आयान शफी शहा (12) व हुजेफ हुसेन मन्सुरी (11). अशी मयतांची नावे आहेत. तीनही विद्यार्थी अनुक्रमे दहावी व सहावी व पाचवी इयत्तेत मदरसामध्ये शिक्षण घेत होते.
पोहण्याचा मोह बेतला जीवावर
तिघा विद्यार्थ्यांसह अन्य दोघे मित्र शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मदरसा सुटल्यानंतर जेबापूर रस्त्यालगत असलेल्या बिजासनी रो-हाऊस जवळील मुरूम खोदलेल्या पावसाळी पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले असता नौमान शेख, आयान शहा, हुजेफ मन्सुरी हे तिन्ही आपले कपडे काढून पोहण्यासाठी डोहाजवळ थांबले व त्यांचे दोन मित्र जवळच्या ग्राउंडजवळ खेळण्यासाठी गेले. आपले तिन्ही मित्र अजून का येत नाहीत हे पाहण्यासाठी डोहाजवळ गेले असता त्यांना त्या ठिकाणी डोहाबाहेर कपडे काढलेले दिसले. त्यांना शंका आल्याने घाबरून त्यांनी गौतम भटू पवार यांना घटनेची कल्पना दिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. डोहातून तिघा बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर दहफनविधी करण्यात आला.