पिंपरी- बॉलिवूडचा ‘बॅक टू डॅड’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी १३ रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरवमध्ये राहणा-या डॉ. सॅम्युअल कांबळे याने सहकलाकाराची भूमिका बजावत बॉलिवडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातून व्यसनाधीनता, चोरी, प्रेम, मैत्री अशा विविध गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.
सॅम्युअल पिंपळेगुरव येथील रहिवाशी आहे. पुण्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सॅम्युअल याने आपले प्राथमिक शिक्षण स्पाईसरच्या प्राथमिक शाळेमधून आणि सेंट जोसेफच्या बॉयज हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून त्याने पुण्यातील बी.जे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरची पदवी घेतली आहे.
सॅम्युअलने राज्यस्तरावरील रोल प्ले स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील जिंकले आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभात कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बॅक टू डॅड’ चित्रपटातून सॅम्युअल बॉलिवडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो सॅम्युअल या नावानेच सहकलाकाराची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट शुक्रवारी (दि.13 रोजी देशभरासह पिंपरीतील ‘पीव्हीआर’ सिनेमा आणि कार्निवल सिनेमामध्ये प्रदर्शित होणार आहे.