पिंपळे गुरवमध्ये महेश मंडळातर्फे उत्पत्तीदिन साजरा

0

सांस्कृतिक कार्यक्रम केले सादर

सांगवीःसांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाज उत्पत्ती दिनानिमित पिंपळे गुरव येथे नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास समजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमास नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनावणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सुनील लोहिया, सतीश लोहिया, निलेश अट्टल, दीपेश मालानी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध स्पर्धांचे आयोजन
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस, एकल व युगल नृत्य व समुहनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सहभागी मुलांनी प्लास्टिकबंदी, सैनिक, डॉक्टर, वकील, अभिनेता आदी व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी महिलांनी राजस्थानी नृत्य, तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या गाण्यावर आधारीत समुह नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल भट्टड व पूनम काबरा यांनी केले. तर परीक्षक म्हणून विक्रांत देव्हारे, वैशाली नाईक व मिलिंदकुमार यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद तापडिया, गणेश चरखा, गजानंद बिहाणी, विवेक झंवर, हेमंत पल्लोड, पद्मा लोहिया आदींनी परिश्रम घेतले.