पिंपळोलीचे शिवार फुलविण्यासाठी आठ लाख लिटर क्षमतेची विहीर सज्ज

0

पिंपरी-चिंचवड : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने मुळशी तालुक्यातील पिंपळोली गावात आठ लाख लिटर क्षमतेची विहीर बांधण्यात आली. या विहिरीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या विहिरीमुळे गावाला शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी रोटरीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, उपाध्यक्ष विजय काळभोर, सुहास ढमाले, साधना काळभोर, सुजाता ढमाले, सरपंच बाबा शेळके आदी उपस्थित होते.

मुबलक पाणी, फुलणार शेती
पावसाळा सुरू झाला, मात्र अद्याप पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. पाऊस पडला नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ निगडीने पिंपळोली गावात राबविलेला उपक्रम गावासाठी वरदान ठरणारा आहे. रोटरीच्या वतीने आठ लाख लिटर साठवण क्षमता असलेली विहीर नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. विहिरीतील मुबलक पाणीसाठ्यामुळे आसपासच्या परिसरातील शेती जोमाने फुलणार आहे.

रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने पिंपळोली गावातील लोकांची जीवनशैली उंचावण्यासाठी मागील पाच वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. रोटरी कडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे गावातील नागरिकांची आर्थिक संपन्नता वाढेल. त्याच उद्देशातून या विहिरीचे काम करण्यात आले आहे. गावाजवळ असलेल्या धरणातील पाणी विहिरीत सोडण्यात येणार असून ते पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी गावात 18 बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रदूषण, धुराचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
– हेमंत कुलकर्णी, अध्यक्ष