१०० काेटींतून काम करा; नागरिकांकडून मागणी
जळगाव- शहरातील डीपी रस्त्यांची नव्याने निर्मिती करण्याचे नियाेजन पालिकेकडून सुरू झाले अाहे. यात पिंप्राळा ते भाईटेनगर रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून नव्याने बांधणी करण्याची मागणी परिसरातून हाेत अाहे. १०० काेटींतून या रस्त्यासाठी नियाेजन केल्यास महामार्गावरून शहरात जाणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी हाेईल. पर्यायाने अपघातांची भीतीही टळणार अाहे.
महापालिका निवडणुकीनंतर पंधराच दिवसात मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी १०० काेटींचा निधी मंजूर केला अाहे. या निधीतून शहरातील डीपी रस्त्यांची नव्याने बांधणी करण्यात येणार अाहे. यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून रस्त्यांसाठी अंदाजपत्रक तयार करून ते सादर करण्याचे अादेश अायुक्तांनी दिले अाहेत. यात शहरातील १२ ते २४ मीटरपर्यंतच्या चार प्रकारच्या रस्त्यांचा समावेश असणार अाहे. दरम्यान, पिंप्राळा येथील साेमाणी मार्केटपासून थेट भाेईटेनगर रेल्वे गेटपर्यंत रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने वाहतुकीला अडचण येत असते. अनेकदा पथदिवे बंद असल्याने अंधारामुळे अपघातांची शक्यता अाहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक टाकल्यास सुरक्षित वाहतूक हाेईल.