अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा ; मयत महिलेची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान
मुक्ताईनगर- तालुक्यातीील पिंप्राळा शिवारातील कुर्हा-धुपेश्वर रस्त्यालगतच्या धुपेश्वर पुलाजवळील वनविभागाच्या कपार्टमेंट क्रमांक 576 मधील झुडूपांमध्ये कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयत महिला नेमकी कोण, कुठली व कुठून आली? या प्रश्नांचा उलगडा करण्याचे आव्हान मुक्ताईनगर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून करून विवाहितेचा मृतदेह फेकला
शनिवारी सकाळी साडेदहा वाजेपूर्वी धुपेश्वर पुलापासून काही अंतरावर काटेरी झुडूपांमध्ये एका गोणीत प्लॅस्टीक कागदात मृतदेह असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे, पोलिस निरीक्षक अशोक कडलग व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पाहणीत मयत महिलेचा पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने व हिरव्या रंगाची ओढणीने गळफास दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या महिलेचा खून करून अज्ञात आरोपींनी झुडूपांमध्ये मृतदेह फेकल्याची दाट शक्यता आहे शिवाय या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. मयत महिलेचे नेमक्या वयाबाबतही संभ्रम आहे. वैद्यकीय अधिकार्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. आठ वा दहा दिवसांपूर्वी या महिलेला येथे मारून फेकल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात हवालदार सुधाकर शेजाळे करीत फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.