पिंप्राळ्यातील विवाहितेचा छळ : पतीसह सात जणांविरोधात गुन्हा

जळगाव : व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपये दिल्यानंतरही सासरच्यांची पैशांची हाव थांबली नाही व त्यांनी विवाहितेचा छळ सुरू ठेवल्याने जळगावातील पतीसह सात जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैशांची हाव थांबलीच नाही
पिंप्राळा परीसरातील इंद्रनील सोसायटीतील माहेर असलेल्या अश्विनी राहुल चिंचाळे (25) यांचा विवाह शहरातीलच कांचन नगरातील राहुल सुभाष चिंचाळे यांच्याशी मार्च 2018 मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविले. त्यानंतर सासू, सासरे, माम सासरे, मावस सासू आणि आते सासू यांनी विवाहितेला स्वयंपाकाच्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच हुंड्यात काहीही दिले नसल्यामुळे माहेरहून दोन लाख रुपये आणायचे सांगितले. त्यानुसार विवाहितेने माहेरहून दोन लाख रुपये रोख त्यांना दिले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला काही दिवस चांगले वागवले. पुन्हा पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून आठ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार ऑनलाइन पद्धतीने आठ लाख रुपये दिले मात्र सासरच्या मंडळींची पैशांची हाव थांबलीच नाही. सासरच्या मंडळींनी अजून पुन्हा 10 लाखांची मागणी केली व या छळाला कंटाळून विवाहिता इंद्रनील नगर येथे माहेरी निघून आल्या.

सात आरोपींविरोधात गुन्हा
गुरुवार, 28 एप्रिल रोजी विवाहिता अश्‍विनी चिंचाळे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती राहुल सुभाष चिंचाळे, सासरे सुभाष दंगल चिंचाळे, सासू नलिनी सुभाष चिंचाळे, जेठ प्रमोद सुभाष चिंचाळे (सर्व रा.कांचन नगर), मावस सासू प्रमिला सुकलाल कोळी, आते सासू सुनिता सुरेश सैंदाणे (दोन्ही रा.मलकापूर) व माम सासरे मुकेश नागो सोनवणे (वडनगरी, ता.जळगाव) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.