जळगाव : शहरातील पिंप्राळा परीसरातील विजय नगरातील पल्लवी महेश पाटील (26) या विवाहितेने राहत्या घरात बुधवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुनेचा मृतदेह पाहताच सासु-सासुर्यांनी फोडला हंबरडा
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवी पाटील ह्या पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्यास आहेत. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केटमधील जळगाव पीपल्स बँकेत क्लार्क म्हणून नोकरीला आहे तर पल्लवी पाटील ह्या राहत्या घरात खाजगी शाळा सुरू करून उदरनिर्वाह करतात. बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी पती महेश पाटील हे कामावर निघून गेले. दरम्यान पल्लवी पाटील यांनी घराच्या मागच्या रूममध्ये सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुनबाईने आत्महत्या केल्याचे पाहून सासू व सासरे यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणार्या नागरीकांसह नातेवाईकांनी पल्लवी यांना खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले होते.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गुरुवार, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती महेश पाटील, सासू अंजनाबाई, सासरे हेमलाल पाटील आणि पाच वर्षाची मुलगी उर्वशी असा परीवार आहे. दरम्यान, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे ठोस कारण कळू शकले नाही.