पिगोंडे शाळेची पटसंख्या सुस्थितीत ठेवल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन – किशोर जैन

0

नागोठणे : जिल्हा परिषद सदस्य या नात्याने मतदारसंघातील शाळांचा विकास करण्यासाठी प्राधान्य देणार आहे. विभागातील अनेक शाळांमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या ध्यासाने विद्यार्थ्यांची गळती लागली असली, तरी विभागातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पटसंख्या लक्षणीय अशीच असून त्याचे श्रेय सर्वस्वी शिक्षकवर्गाकडेच जाते असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी काढले. पिगोंडे शिवसेना शाखेच्या वतीने सलग 32 वा शालेय साहित्य वितरण समारंभ पिगोंडे मराठी शाळेत पार पडला, त्यावेळी जैन बोलत होते.

शाळेत संगणाकांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळेसाठी इंग्रजी विषय शिकविणार्याल एका शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पिगोंडे हद्दीतील वेलशेत आणि आंबेघर ही दोन्ही आयपीसीएल प्रकल्पग्रस्त गावे असली तरी आताच्या रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत सेवांकडे कायम दुर्लक्ष केले असल्याची खंत व्यक्त करताना रिलायन्सकडून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना संगणक तसेच इतर साहित्य उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे किशोर जैन यांनी यावेळी सांगितले. सलग 20 वर्षे या कार्यक्रमाला येत असून यापुढे कोणत्याही मोठ्या पदावर गेलो, तरी दरवर्षी या समारंभाला येणारच! असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
गंगाराम मिणमिणे, बळीराम बडे यांचेसह काही शिवसैनिकांनी 50 हजार रुपये खर्चून प्राथमिक शाळेतील 1 ते 7 आणि गीताबाई तटकरे माध्यमिक शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रजिस्टर आणि खाऊचे वाटप करते असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमाला रोहे पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, पिगोंडे ग्रा. पं. च्या सरपंच शैला बडे, ग्रा. पं.सदस्य तथा आंबेघरचे शाखाप्रमुख गंगाराम मिणमिणे, सुधाकर पारंगे, ज्योत्स्ना शेलार, नंदिनी बडे, तालुका संघटक विलास चौलकर, दामा बावकर, बळीराम बडे, राजेंद्र हडकर, तुकाराम खांडेकर, अजित शिर्के, संजय शेलार, जनार्दन पाटील, सखाराम पाटील, रंजना माळी, पुंडलीक गदमले, सखाराम घासे, प्रदीप मढवी, सुभाष मढवी, नथुराम माळी, कीर्तिकुमार कळस आदी मान्यवरांसह नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात तटकरे शाळेत दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे गौरव करण्यात आला. प्रास्ताविक बळीराम बडे यांनी, तर सूत्रसंचालन तुकाराम खांडेकर गुरुजींनी केले.