पिचकार्‍यांसह विविध रंगांच्या किमतीत 5 टक्के झाली वाढ

0

खालापूर । होळी रे होळी पुरणाची पोळी अशा घोषणा देत बच्चे कंपनीसह तरुणाई व ज्येष्ठ मंडळी होळी व धूलीवंदन सण साजरा करत असतात. हा सण सर्वांच्याच आवडीचा आहे. परंतु, या सणावर महागाईचे सावट पसरले आहे. बाजारात गेल्या चार दिवसांपासून बचचे कंपनीच्या आवडीचा पिचकार्‍या वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या दाखल झाल्या आहेत. या प्रत्येक वस्तूच्या किमतीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांनी महागाईवर मात करत पिचकार्‍या व रंग खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे. होळी सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी होळी सण साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.

प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी सण साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.1 मार्च रोजी होळी सण साजरा करण्यात येणार आहे. या पहिल्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र होळीचे दहन करण्यात येणार आहे. दुसर्‍या दिवशी धुलीवंदन साजरा करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी रंगाची उधळण करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. होळी व धुलीवंदन सण साजरा करण्यासाठी लागणार्‍या पिचकार्‍या, फुगे व रंग गेल्या चार दिवसांपासून बाजारात आल्या आहेत. त्यामध्ये साधी पिचकारी, बंदूकवाली पिचकारी, मासे, मोर, पाइपवाली पिचकारी तसेच लहान मुलांच्या आवडीच्या कार्टूनची पिचकारी बाजारात आल्या आहेत.

दहा रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत पिचकार्‍याची किंमत आहे तसेच फुगेही व वेगवेगळे रंगही बाजारात उपलब्ध झाले आहेत. ईको फ्रेन्डली रंगही उपलब्ध असून, प्रत्येक वस्तूची किंमत पाच टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे होळी सणावर महागाईची सावट पसरली आहे. तरीही ग्राहकांनी महागाईवर नाक मुरडत वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात बाजारा खरेदीसाठी गर्दी होणार असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.