पिता-पुत्राच्या जोडीने अनेक ठिकाणी मारला ‘हात’

0

जळगाव। गोलाणी मार्केटमधील जलराम गिफ्ट हाऊस या दुकानात 27 मार्च रोजी सायंकाळी 6.25 वाजता पिता पुत्राच्या जोडीने गाय, वासराच्या मूर्तीची चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेक जणांनी त्यांचे दुकान गाठत त्यांच्याकडेही याच पिता-पुत्रांनी चोरी केल्याचे कथन पंचमिया यांच्याकडे करीत होते. जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या चर्चच्या बाहेर महेश रामकृष्ण ठाकूर (रा. रामानंदनगर) हे फळांची गाडी लावतात. बुधवारी वृत्तपत्रात प्रकाशित बातमी बघून त्यांनी जलाराम गिफ्ट हाऊस गाठले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, एक वर्षापुर्वी हेच दोघे त्यांच्याकडे फळ घेण्यासाठी आले होते. 5 किलो डाळींब घेतल्यानंतर ठाकूर यांच्या पत्नीने त्यांना बाजुलाच घर असल्याने नाश्ता करण्यासाठी घरात बोलावले.

त्यावेळी डाळींब मोजलेले होते. ठाकूर यांच्या पत्नीला या दोन्ही ठगांनी पैसे नानाभाऊ देणार असल्याचे सांगून पोबारा केला. काही वेळानंतर ठाकूर बाहेर आले. त्यांनी डाळींबाचे पैसे घेतले का? असे पत्नीला विचारल्यानंतर त्यांनी नानाभाऊ देणार असल्याचे सांगून दोघे निघून गेले. त्यानंतर 15 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पुन्हा तेच भामटे ठाकूर यांच्याकडे शहाळे घेण्यासाठी आले. त्यांनी पाच शहाळे घेतले. त्याचवेळी एक महिला ग्राहकाने फळांची मागणी केली. त्यामुळे ठाकूर यांनी पाठ फिरवताच दोघे फरार झाले. त्यानंतर ठाकूर आणि त्यांचा फळविक्रेता मित्र रहीम शहा मुसा शहा यांनी 16 मार्च रोजी दोन्ही भामट्यांना महाबळ परिसरात पकडले. त्यावेळी त्यांनी आम्ही काही चोर वाटलो का? अशी अरेरावी करून पसार झाले. बुधवारच्या अंकात त्यांचे फोटो बघितल्यानंतर हे भामटे तेच असल्याचे ठाकूर यांनी ओळखले.

अनेक दुकानांमधून चोर्‍या…
शहरातील नामांकीत सुपर शॉपी, मॉल मधूनही या चोरट्यांनी चोर्‍या केल्याचे समोर आले आहे. मात्र त्या विषयी कोणीही गुन्हा दाखल केला नसल्याने या चोरट्यांचे चांगलेच फावते. गिरणा पाण्याच्या टाकीजवळही एक महिन्यापुर्वी एका फळविक्रेत्याला असेच फसविले होते. त्यावेळी बापाने सांगितले होते. की मुलगा सावलीया स्विट्स या दुकानातून मिठाई घेऊन येत आहे. तो पैसे देईल. असे सांगून फळे घेऊन पसार झाला होता.