पितृसत्ताक संस्कृती मोडीत निघून जगात महिलांचे राज्य निर्माण होणार

0

बोदवड । पितृसत्ताक संस्कृती 2050 साली मोडीत निघून मातृसत्ताक संस्कृती प्रस्थापित होणार आहे. त्यासाठी एका हातात लेखणी आणि एका हातात लॅपटॉप या साधनांचा उपयोग आजच्या मुलींनी करावा. त्यासाठी ग्रहांशी खेळणार्‍या कल्पना चावला तुम्हाला बनाव्या लागतील. म्हणून 2050 साली जगात महिलांचे राज्य येईल, असे तालुक्यातील साळशिंगी येथे मानवताधर्म आश्रमात व जनसेवक उत्तमराव महाराज यांच्या प्रबोधन सप्ताहानिमित्त खेडेकरांनी प्रतिपादन केले.

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे
पुढे बोलतांना खेडेकर म्हणाले की, मुला-मुलींना प्रत्येक घरामध्ये पुरुषांनी सन्मान देवून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. इथल्या तरुणांनी लिहिते, बोलले पाहिजे, वाचले पाहिजे नाही तर पुन्हा पुन्हा आपल्यावर गडकरी, भांडारकर फोडण्याची वेळ येईल. तरुण-तरुणींनी नाट्य क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात आपले अस्तित्व तयार केले पाहिजे. यासाठी वाचन, लेखन महत्वाचे असल्याचे सांगितले.

तरुणांनी प्रयत्नवादी व्हावे
शाळेत गेल्या 25 वर्षे प्रतिक्षेत सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आपण म्हणत असतो पण हल्ली भाऊ भावाला भाऊ म्हणत नाही. आपण आत्मकेेंद्री झालो आहोत. त्यासाठी बहुजनवादी साम्राज्यातील तरुणांनी सक्षम समाजनिर्मितीसाठी प्रयत्नवादी व्हावे. आजच्या युगातील शिवाजी घडविण्यासाठी एका हातात लेखणी आणि दुसर्‍या हातात संगणक असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

निचकृत्य खपविणार नाही
आजकाल प्रत्येक शहरात दांभिक पारायण, रामदासी बैठकीचे स्तोम सुरु आहे. समाजात मनुवादी प्रवृत्ती निर्माण झाल्या आहे. याच मनुवादी प्रवृत्तींनी मुक्ताई संस्थानातील उत्तमराव महाराजांचा मंडप जाळला होता व शिष्यांंना मारहाण झाली होती. आता यापुढे असे निच कृत्य मराठा सेवा संघ खपवून घेणार नाही. आडवे येणार्‍यांना कायमस्वरुपी आडवे करु, असे चंद्रशेखर शिखरे यांनी ठणकावून सांगितले. यशस्वीतेसाठी समाधान सुशीर, संजय काकडे, संभाजी ब्रिगेड, अनंता वाघ, प्रकाश महाजन, अतुल पाटील, साहेबराव चौधरी यांनी परिश्रम घेतले.

यांची होती उपस्थिती
यावेळी इतिहासकार चंद्रशेखर शिखरे, प्राचार्य गुलाबराव खेडेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव बी.आर. पाटील, मीरा जंगले, मराठा सेवा संघ मध्यप्रदेश प्रमुख सुनिल महाजन, मानवता धर्म आश्रम प्रमुख जनाबाई महाराज उपस्थित होते.