पिंपरी-चिंचवड : पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी ‘श्राद्ध आंदोलन’ केले. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे श्राद्ध घालण्यात आले. पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन झाले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, निकिता कदम, मंदा आल्हाट, गंगा धेंडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, दत्ता साने, मयुर कलाटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, तानाजी खाडे, अॅड. गोरक्ष लोखंडे, सरचिटणीस फजल शेख, संघटक विजय लोखंडे, आनंदा यादव, विशाल वाकडकर आदी सहभागी झाले.
लक्षवेधी घोषणा
‘सोने के बिस्कूट पर तीन टक्के जीएसटी और खाने के बिस्कूट पर 18 टक्के जीएसटी, वाह रे चायवाले’, ‘पेट्रोल वाढले बेसुमार बीजेपीची लुटमार’, ‘बहुत हुई जनता पर पेट्रोल, डिझेल की मार ये देखो मोदी सरकार…मोदी सरकार’, ‘बोगस कर्जमाफी बोगस सरकार’, ‘शेतकर्यांच्या आवाज दाबणार्या सरकारचा धिक्कार असो’, ‘एकही भूल कमल का फूल’ असा मजकूर लिहिलेले फलक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतले होते. तसेच भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, भाजप सरकारचा धिक्कार असो अशा भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.