वस्त्यांमध्ये वीज नाही, रस्ता नाही, पाण्यासाठी केवळ एक हॅन्डपंप, राहण्यासाठी योग्य घरे नाही…अशा परिरिस्थितीत राहणारे पिपल्यापाडा येथील रहिवाशांचा रस्ता नसल्याने नाल्यातून बिकट वाट काढीत जगण्याचा संघर्ष सुरू आहे… शासनाच्या कुठल्याही योजना, सुविधा या गावापर्यंत पोहचलेल्या नाही. विकास ही संकल्पना या गावापासून कोसोदूर असून आम्हीही माणंस आहोत..आमच्याकडेपण बघा….आम्हाला पण मुलभूत सुविधांचे हक्क द्या…हा अंधार दूर करा. अशी आर्त हाक.. पिपल्यापाड्यावरील ग्रामस्थांमधून येत आहे. लोकसंख्या कमी असल्याने एका गल्लीत वसलेले हे गाव शासनाच्या नजरेच्या खूपच दूर असल्याचे चित्र असून शासनाने किमान मुलभूत सुविधा तरी पुरवाव्या अशी मागणी होत आहे. शहादा तालुक्यातील मंलगाव ग्रामपंचायती हे पिपल्यापाडा आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद मंदाणे परिसरातील मलगावजवळील पाच सात किलोमिटी अंतरावर असलेले पिपल्यापाडा हे गाव. गावात कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नसून या गावातील लोक मुलभूत सुविधांपासून वंचति आहेत. नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यातील अनेक गावे विकासापासून वंचित असल्याचे चित्र या पिपल्यापाडा वासीयांचे जगणे बघितल्यानंतर समोर येते. पिपल्यापाडा येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून कोणतेही चारचाकी वाहन जात नाही. रस्त्यावर साधी खडी देखील टाकलेली नाही. या रस्त्यावर नाला असून त्यातून लोकांना नेहमी वापरावे लागते. पक्का रस्ता नसल्याने नेहमी दैनंदिन नाल्यातून कसरत करत लोकांंचा वापर सुरू आहे. गावात पाण्याची पूर्ण व्यवस्था नसून गावासाठी केवळ एकच हँन्डपंप आहे. गावात वीजेची व्यवस्था नसून केवळ सौर उर्जेवर चालणारे तीन लाईट बसविण्यात आलेले आहेत. ग्रमास्थ मात्र अंधारात रात्र काढतात. राहण्यासाठी योग्य घरे नाहीत. शासनाच्या घरकुल योजनेपासून गावातील कुटुंब वंचित आहेत.परिसरातील वनजमीनी शासनाने दिल्या असून त्यावर शेती करून उदरनिर्वाह करता, शेतातही पाहिजे तसे उत्पन्न नसल्याने चार महिने दरवर्षी बाहेर गावी कामाला जावे लागते. मुलांना शिक्षणासाठी मलगाव येथे जावे लागते त्यातही रस्ता नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पावसाळ्यात त्यांना घरीच राहावे लागते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा या रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.
– संजय जगताप,असलोद