‘पिफ’ महोत्सव 11 जानेवारीपासून

0

पुणे । ’पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणार्‍या ’पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे. यंदाचा ’पिफ’ महोत्सव 11 ते 18 जानेवारी, दरम्यान होणार असून ’तरुणाई’ ही महोत्सवाची प्रमुख ’थीम’ असणार आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या आणि दरवर्षी चित्रपटप्रेमींना प्रतिक्षा असलेल्या या महोत्सवाचे हे 16 वे वर्ष आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती ुुु.ळिषषळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून आज सोमवार दि. 11 डिसेंबर पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह त्यांना सिटी प्राईड- कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा मंगला चित्रपटगृह यांपैकी कोठेही जाऊन ’स्पॉट रजिस्ट्रेशन’ करावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे ’स्पॉट रजिस्ट्रेशन’ 20 डिसेंबरपासून वर सांगितलेल्या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत करता येणार आहे.

विद्यार्थी, ’फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांपुढील ) यांना ओळखपत्र दाखवून रुपये 600 मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये 800 इतके आहे.