भोसरी : पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनीट एकच्या पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाला अटक केली. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी सायकांळी साडेपाचच्या सुमारास केली. करण रमेश जाधव (वय 20, रा. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखा युनीट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण हा भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या गेटवर संशयितरित्या उभा आहे. त्याच्याजवळ शस्त्र आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन गुन्हे शाखा युनीट एकच्या पोलिसांनी तरुणाला सापळा रचत ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत क ाडतुसे अढळली. यावरून त्याच्यावर शस्त्र अधिनियम आणि मुंबई पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक के. के. लांडगे तपास करीत आहेत.