पिस्तूल विकणार्‍या दोघांना अटक

0

भोसरी : पिस्तूल विक्री करणार्‍या दोन तरुणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 92 हजार 400 रुपये किमतीच्या तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मोहन सुभाष कोळी (वय 21, रा.चाकण), रामप्रसाद संतोष सोलंकी (वय 19, रा.मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी टोलनाक्याजवळ इंद्रायणी हॉटेल शेजारी एक तरुण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी मोहन कोळी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. यावरून त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याचा मध्य प्रदेश येथील आणखी एक साथीदार रामप्रसाद पिस्टल विक्रीसाठी एमआयडीसी भोसरी परिसरात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रामप्रसाद सोलंकी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे एक पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. यावरून त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका आठवड्याच्या कालावधीत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेडगे, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश चौधरी, पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे, संदीप भोसले, पोलीस नाईक संजय भोर, किरण काटकर, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पोटे, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, करन विश्‍वासे, विशाल काळे, अमोल निघोट यांच्या पथकाने केली.