पीएनबीत पंतप्रधान मुद्रा योजनेतही घोटाळा

0

राजस्थानमधील बाडनेर शाखेतील प्रकार

बाडनेर : पंजाब नॅशनल बँकेतील 11,400 कोटींच्या घोटाळ्यानंतर बँकींग क्षेत्र हादरले असतानाच आता याच बँकेच्या राजस्थानमधील बाडनेरयेथील शाखेत प्रधानमंत्री मुद्रा योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. सीबीआयने याप्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मुद्रा योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा ते उल्लेख सातत्याने बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना करत असतात. या योजनेत अतिशय कमी व्याजदरात उद्योग-व्यावसायासाठी कर्ज मिळते. कर्ज देताना कर्जदाराच्या उद्योगाची आणि निवासाची माहिती, हमी घ्यावी लागते. मात्र, मुद्रा योजनेतून कर्ज देताना या बँकेने नियमाचे पालन केलेले नाही.

व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील पीएनबीच्या बाडनेर शाखेतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाने सप्टेंबर 2016 ते मार्च 2017 या काळात बेकायदेशीर पद्धतीने 26 मुद्रा कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. यामुळे बँकेला सध्या पाच कर्जप्रकरणात 62 लाखांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सीबीआयचे म्हणणे आहे की, या घोटाळ्यात पीएनबी बँकेने कोणतीही हमी न घेताच कर्जदारांना कर्ज दिले आहे. ही सर्व कर्जे बेकायदेशीर आहेत. सीबीआयने या प्रकरणी बाडनेर शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक इंदरचंद्र चंदावत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

2 कोटी अन्य खात्यात वळविले
या व्यवस्थापकाने कर्ज देण्यापुर्वी कर्जदाराची सर्व माहिती, हमी घेतली नाही किंवा त्याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेतली नाही. 26 कर्ज प्रकरणात केवळ एकाच कर्जदाराची माहिती घेण्यात आली आहे. तसेच कोणत्याही बँकेला 25 किलोमीटर परिघात राहणार्‍या व्यक्तीलाच कर्ज देता येते. मात्र, पीएनबीने 100 किलोमीटरवर राहणार्‍या व्यक्तीसही कर्ज दिले आहे. या 26 कर्जप्रकरणातील पाच कर्ज थकीत झाली असून आता बँक कारवाईही करू शकत नाही. संबंधीत शाखा व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई यापुर्वी करण्यात आली होती. परंतु, त्यास पुन्हा कामावर घेण्यात आले. सध्या तो राजस्थानमधील अबू रोड येथील पीएनबी शाखेत कार्यरत आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पीएनबी बँकेला कोट्यवधी रूपयांचा गंडा घातला आहे. आता नव्या मुद्रा घोटाळ्यातील आरोपी व्यवस्थापक इंदर चंद्र चंदावत याच्यावर आरोप आहे की, त्याने सुमारे दोन कोटी रूपयांची मुद्रा योजनेतील रक्कम अन्य खात्यात वळविली आहे.

नोटाबंदीआधीच पीएनबीत 90 कोटी रुपये बदलले
-राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांचा आरोप
नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 या नोटाबंदी जाहीर झालेल्या दिवसाआधीच पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेतून 90 कोटी रुपयांच्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार माजिद मेमन यांनी केला आहे. यावरुन नोटाबंदीची माहिती आधीच काही लोकांना माहित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मेमन यांनी एका अहवालाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मेमन यांनी आरोप केलेल्या मुद्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा नीरव मोदी भारत सोडत होता त्याचवेळी एक असा अहवालही आला होता की, नोटाबंदीच्या घोषणेच्या काही काळ आधी पीएनबीच्या एका शाखेत 90 कोटी रुपयांची रोकड बदलून घेण्यासाठी आणण्यात आली होती. त्यांनी सांगितले, जर ही गोष्ट खरी असेल तर या प्रकरणाचीही चौकशी व्हायला हवी. इतकेच नव्हे तर नीरव मोदीने जुन्या नोटा बदलल्याच्या बदल्यात पीएनबी बँकेला मोठी रक्कमही दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.