अडिच कोटींची मालमत्ता 18 कोटींची दाखवून फसविले
पुणे : बँकेच्या व्हॅल्युअरला हाताशी धरून केवळ अडिच कोटी रुपयांची मालमत्ता 18 कोटी रुपयांची असल्याचे कागदोपत्री दाखवून, त्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून बँक ऑफ महाराष्ट्रकडून तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचे कर्ज उचलणार्या भामट्याने नंतर हे कर्जच बुडविले. त्यामुळे महाराष्ट्र बँकेला तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा चुना लागला आहे. देशभरात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)चा घोटाळा गाजत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने पुण्यातील बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून, दिल्लीस्थित व्यापार्याचा शोध सुरु केला होता. अमित सिंगल असे या भामट्याचे नाव असून, त्याच्यासह हमीदार रोशनलाल भलोटिया याच्याविरुद्धदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मालमत्ता विकायला गेले अन् बिंग फुटले
सिंगल याचे दिल्लीत आशीर्वाद चेन कंपनी नावाचा उद्योग आहे. तर रोशनलाल भलोटिया हा या फसवणूक प्रकरणात हमीदार आहे. या दोघांच्या मालमत्तेचे टेक मॅक इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हॅल्यूअरने तब्बल 18 कोटी रुपये इतके मूल्य ठरविले होते. त्याआधारे बँक ऑफ महाराष्ट्रने सिंगल याला साडेनऊ कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज मंजूर केले होते. 2010 ते 2012 या कालावधीत सिंगल याने हे कर्ज उचलले व नंतर ते परतफेड केलेच नाही. त्यामुळे एवढी मोठी रक्कम बुडीतखाती जमा झाली. बँकेने सिंगल याच्यासह हमीदाराची मालमत्ता विकून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला असता, फसवणूक झाल्याची बाब बँकेच्या लक्षात आली. ज्या मालमत्तांची किंमत 18 कोटी इतकी दाखविण्यात आली होती, प्रत्यक्षात त्या मालमत्तांची किंमत केवळ अडिच कोटी रुपये इतकीच होती. कर्ज मंजूर करताना रोशनलाल याच्या दुमजली इमारतीची किंमत 4.85 कोटी इतकी दाखविण्यात आली होती. प्रत्यक्षात ती 73 लाख इतकीच निघाली. तसेच, दिल्लीतील चांदणी चौकातील वाणिज्यिक इमारतीची किंमत 4.95 कोटी दाखविण्यात आली होती. प्रत्यक्षात ती 31 लाख रुपयाचीच निघाली. खोटे मूल्यांकन दिल्याप्रकरणी महाराष्ट्र बँकेने टेक मॅकला व्हॅल्युअर पॅनलवरून काढून टाकले असून, कर्जदार व हमीदाराविरोधात सीबीआयकडे गुन्हे दाखल केले आहेत.
खोटी कागदपत्रे बनविली!
बँकेला फसविणारा अमित सिंगल याने खोटी कागदपत्रे सादर केल्याचेही निदर्शनास आले आहे. खोटे बॅलन्सशीट, खोटे ऑडिट रिपोर्ट, तसेच, इतर संस्थांकडून घेतलेली कर्जे याबद्दल सिंगल याने चुकीची माहिती देऊन बँक ऑफ महाराष्ट्रला फसविले आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर बँकिंग क्षेत्र हादरले असताना, हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांनी तातडीने सीबीआयकडे धाव घेतली. सीबीआयनेदेखील सिंगल याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी फरार झाले असल्याचा संशय असून, सीबीआय त्यांचा कसून शोध घेत आहे.
ओरिएंटल बँकेलाही 390 कोटींचा चुना
पीएनबी बँकेच्या 11,400 कोटींच्या घोटाळ्यानंतर आता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्येही तब्बल 390 कोटी रुपयांचा घोटाळा शनिवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीबीआयने चौघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या घोटाळाप्रकरणी बँकेने सहा महिनेआधीच सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, सीबीआयने काहीच कारवाई केली नव्हती. पीएनबी घोटाळ्यानंतर मात्र सीबीआयला जाग आली असून, त्यांनी दिल्लीस्थित द्वारकादास सेठ इंटरनॅशनल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कंपनी हिरे, सोने, चांदीचे दागिने बनविण्याचे काम करते. कंपनीचे संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्णकुमार सिंह, रवी सिंह अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी पीएनबीप्रमाणेच लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे कर्ज घेतले होते. त्याची परतफेडच केली नाही. सर्व आरोपी दुबईत लपून बसले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.