पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर येणार निर्बंध

0

नवी दिल्ली-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (इपीएफओ) भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातून पैसे काढण्याबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. याद्वारे पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध येऊ शकतात. पैसे काढण्याची कमाल मर्यादा ठरवण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इपीएफओच्या विश्वस्त मंडळाची २६ जून रोजी बैठक होणार आहे, या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 ६० टक्के रक्कमच काढता येईल

बिजनेस स्टॅंडर्डच्या एका वृत्तानुसार, पीएफ खात्यातून सातत्याने पैसे काढले जात असल्यामुळे इपीएफओ चिंतेत आहे. त्यामुळे नवा प्रस्ताव आणण्यावर विचार सुरू आहे. या प्रस्तावाद्वारे निवृत्तीच्या आधी पीएफ खात्यातून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निश्चित केली जाईल. म्हणजे खातेधारक एकूण रकमेच्या केवळ ६० टक्के रक्कमच पीएफ खात्यातून काढू शकतो. सध्याच्या नियमानुसार नोकरी सोडल्यास किंवा दोन महिने बेरोजगार राहिल्यास एखादी व्यक्ती पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढू शकते. पण नव्या प्रस्तावानुसार, जर एखादी व्यक्ती महिन्याभरापेक्षा जास्त वेळ जर बेरोजगार असेल तर ती व्यक्ती पीएफ काढू शकते. पण ती व्यक्ती खात्यातून संपूर्ण पैसे काढू शकणार नाही, त्याला केवळ ६० टक्के रक्कमच खात्यातून काढता येईल.

आर्थिक सुरक्षा वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश असू शकतो. कारण नोकरी गमावल्यानंतर जर एखादा व्यक्ती पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढून घेत असेल तर त्याचे खाते डेड होते आणि जेव्हा तो पुन्हा नोकरी सुरू करतो तेव्हा त्याचं अकाउंट फ्रेश असते. त्यामुळे पीएफ खात्यामुळे मिळणाऱ्या पेन्शनचा फायदा त्याला मिळत नाही. पेन्शन मिळवण्यासाठी १० वर्ष सतत पीएफ खाते सुरू राहणे गरजेचे असते.