पीएफ मस्टर सादर करण्याची भूमिका अयोग्य

0

जळगाव। शहरातील महापालिकेची विविध कामे करणार्‍या मक्तेदारांना सन 2011 पासूनची त्यांच्याकडील कामगारांचे पीएफसाठीचे मस्टर सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने मक्तेदारांना केल्या आहेत. प्रशासनाच्या भूमिकेला मक्तेदारांनी अन्यायकारक ठरवून 70 मक्तेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अशा प्रकारे सहा वर्षापासूनचे रेकॉर्ड मागविणे मक्तेदारांना वेठीस धरण्यासारखे असल्याची भावना मक्तेदारांमध्ये दिसून येत आहे. पीएफ व सव्र्हीस टॅक्स लागू नसतांना केवळ अज्ञानामुळे मक्तेदारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील मक्तेदारांनी केला आहे.

मागील महिन्यापासून मक्तेदाराची बिले थकीत
महापालिकेतर्फे ठेका पद्धतीने आरोग्य विभागातील सफाई कामे करणारे, बांधकाम विभागातील रस्त्यांसह इतर कामे करणारे, पाणीपुरवठा विभगातील दुरुस्तीची कामे करणारे असे सुमारे 70 मक्तेदार शहरात विविध कामे करीत असतात. या सर्व मक्तेदारांची बिले मागील महिन्यांपासून थांबविण्यात आली आहेत. या मक्तेदारांकडून पीएफ व सर्वीस टॅक्सची मागणी महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. शासकीय नियमानुसारच मक्तेदारांकडून भरणा करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त सांगत आहेत.

मक्तेदारांची सर्व्हीस टॅक्स लागून नसल्याची भूमिका
मक्तेदार यांनी सर्व्हीस टॅक्स आम्हाला लागू नसल्याचा भूमिका घेतली आहे. याबाबतचे आदेशाची प्रत देखील प्रशासनातील अधिकारी यांना दिले आहेत. प्रशासनाला मात्र त्यातून अर्थ काढता येत नसून त्यांचा अज्ञानामुळे आमचे नुकसान होत असल्याचे मक्तेदाराचे ठाम मत झाले आहे. इतक्या वर्षानतंर मक्तेदारांना कामागारांचे मस्टर मागीतले आहे. आता हे मस्टर कुठून आणावे ? असा प्रश्न मक्तेदारांना पडला आहे. पीएफ संदर्भांत नियमात 20 कायमस्वरुपी कामागार असले तरच पीएफ अकाऊंटची गरज असल्याने पीएफचा नियमच लागु होत नाही.