पीएमआरडीएला सहकार्य करावे : शिवतारे

0

उरळीकांचन । पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार असून त्याचा सर्वात जास्त फायदा नगर रचना योजनेमध्ये (टीपी स्कीम) समाविष्ट जमीनधारकांना होणार आहे. त्यामुळे सर्व जमीनधारकांनी नगररचना योजनेकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

पीएमआरडीएच्या वतीने वडाचीवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे टीपी स्कीम क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन शिवतारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश टिळेकर, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर, वडाची वाडीचे सरपंच दत्तात्रय बांदल, उपसरपंच जिजाबा बांदल, पंचायत समिती सदस्य सचिन घुले, नगरसेवक संजय घुले, उंड्रीचे सरपंच आण्णा बांदल आदी उपस्थित होते.टीपी स्कीममध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून टिळेकर म्हणाले की, टीपी स्कीममुळे या भागाचा विकास होणार आहे. त्यामुळे जमिन मालकांना समृध्दी येणार आहे. यावेळी महानगर नियोजनकार गोस्वामी यांनी नगर रचना योजनेची माहिती उपस्थितांना दिली.

नगररचना योजनेमध्ये (टीपी स्कीम) समाविष्ट जमिन मालकांना त्यांना असलेल्या शंका, माहिती आदी सुलभपणे प्राप्त होण्याकरिता प्राधिकरणाने या गावांमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्थापन केले आहे. यापूर्वी प्राधिकरणाने म्हाळुंगे-माण टीपी स्कीमची माहिती देण्यासाठी म्हाळुंगे येथे क्षेत्रिय कार्यालये सुरू केले आहे. त्यामुळे टीपी स्कीमची माहिती जमीन मालकांना गावातच उपलब्ध होणार आहे.