पीएमआरडीए हद्दीतही परवडणारी घरे

0

पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) त्यांच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात सुमारे पाच ते सहा हजार घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीतही सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उपलब्ध होणार आहे. 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही योजना केंद्र सरकारने आखली आहे. या योजनेला अधिक गती देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत घरबांधणी करणारे विकासक, घरांसाठी कर्जपुरवठा करणार्‍या बँका आणि ग्राहक यांना एकत्रित आणण्याचे काम पीएमआरडीएतर्फे केले जाणार आहे.

बांधकाम व्यावसायिक, लाभार्थ्यांची कार्यशाळा
पीएमआरडीएच्या जागांवर विकसकांसोबत भागीदारीमध्ये घरबांधणी प्रकल्प उभारणे, अडीच लाख रुपयांची सबसिडी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर टीपी स्कीमधील पाच टक्के जागा या परवडणार्‍या घरांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे टीपी स्कीममध्ये ही परवडणारी घरे नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या सर्व माध्यमातून पीएमआरडीएच्या हद्दीत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास चालना मिळणार आहे. याविषयी माहिती देताना प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते म्हणाले, पीएमआरडीएच्या हद्दीत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, लाभार्थी यांची कार्यशाळा घेऊ. त्यामुळे अनेक लोकांना घरे घेणे शक्य होईल. वर्षभरात पाच ते सहा हजार घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे.