पीएमपीएमएलचा 204 कोटींचा तुटीचा अंदाज

0

पुणे । पीएमपीएमएलच्या 2017-18 या आर्थिक वर्षासाठी पीएमपी प्रशासनाने 203 कोटी 90 लाख रुपयांची संचालन तूट गृहीत धरली आहे. यामधील महापालिकेच्या 60 टक्के हिश्श्याची रक्कम पीएमपीला 12 समान हप्त्यांमध्ये देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.महापालिकेच्या सन 2918-19च्या अंदाजपत्रकामध्ये पीएमपीएमएल संस्थेस संचलन तुटीपोटी करण्यात आलेल्या तरतुदीमधून ही रक्कम दिली जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

शासनाच्या निर्णयनुसार गेल्या चार-पाच वर्षांपासून पीएमपीएमएल संस्थेस संचलन तुटीमुळे होणारा खर्च महापालिकेच्या स्वामित्व हिश्श्यानुसार दर वर्षी 60 टक्के रक्कम महापालिकेकडून देण्यात येते. त्यानुसार सन 2017-18 मध्ये पीएमपीएमएल संस्थेला अंदाजित संचलन तूट 203 कोटी 90 लाख रुपये ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेस 122 कोटी 34 लाख रुपये तूट देणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेकडून पीएमपीला सुमारे 34 कोटी रुपये खर्चासाठी उचल म्हणून देण्यात आली आहे. ही रक्कम या तुटीच्या रकमेतून वजा करून उर्वरित 88 कोटी रुपये 12 समान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार प्रतिमाह 7 कोटी 11 लाख रुपये पीएमपीला दिले जाणार असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले. याशिवाय पालिका रुग्णालयांत श्‍वानदंश लसखरेदी आणि उरुळी देवाची कचरा प्रकल्पग्रस्त बाधितांच्या 57 वारसांना एकवट मानधनावर महापालिकेत 6 महिन्यांसाठी घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे.