पीएमपीएमएलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

0

पुणे-अगोदर तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलला डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे दररोज नुकसान सहन करावे लागत आहे. या दरवाढीमुळे पीएमपीएमएलच्या तोट्यात प्रतिदीन साडेचार लाखाची भर पडत आहे. पीएमपीएमएलची ही आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यासंदर्भात चाचपणी सुरु असून लवकरच दरवाढ होणार असल्याचे संकेत पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिले.

सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात डिझेलवर चालणा-या ९०० हून अधिक तर सीएनजीवरील ५७१ बसेस आहेत. तर ६५३ भाडेतत्वावरील बसेस सीएनजीवर धावतात. डिझेलवर धावणा-या काही बसेस बंद आहेत. तर मागील काही दिवसात १३० मिडी बस दाखल झाल्या आहेत. सध्या पीएमपीला दररोज सुमारे ३७ हजार ५०० लिटर डिझेल लागते. त्यासाठी सुमारे २४ लाख रुपये मोजावे लागतात. मागील काही महित झालेल्या दरवाढीमुळे पीएमपीला मिळणा-या डिझेलच्या दरात ४.०९ रुपयांचा फरक पडला आहे. डिझेल दरवाढीमुळे साडेतीन महिन्यात पीएमपीएमएल वरील दैनंदिन आर्थिक बोजा अडीच लाखांपर्यंत वाढला आहे.

तर दुसरीकडे पीएमपीएमएलच्या ताफ्यातील १ हजार २२४ बसेस सीएनजी गॅसवर चालविल्या जातात. जुन्या दराप्रमाणे पीएमपीएमएलला सवलतीच्या दरात पुण्यामध्ये सीएनजी गॅस ४६ रुपये ३० पैसे प्रतिकिलो दराने वितरित केला जात होता. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ रुपये ८० रुपये किलो प्रमाणे गॅस खरेदी केला जात होता. दरम्यान, १६ जूनपासून सीएनजी गॅसमध्ये तब्बल तीन रुपयांची दरवाढ झाली आहे.

शहरात सीएनजी गॅसचा दर ४९ रुपये ३० पैसे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी ४८ रुपये ८० पैसे दराने वितरित करण्यात येत आहे. पीएमपीएमएल महामंडळाला वाढलेल्या सीएनजीच्या गॅस दरामुळे प्रतिकिलो तीन रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दरदिवशी 2 लाखांची तोट्यात भर पडली आहे. हा होणारा तोटा लक्षात घेता तिकीट दरवाढ करण्यासंदर्भात नियोजन सुरु असल्याची माहिती नयना गुंडे यांनी दिली.