पीएमपीएमवर पालिकेतील तज्ज्ञ संचालक हवा

0

नगरसेवकांची महासभेत मागणी

पिंपरी-चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)मध्ये पिंपरी-चिंचवडच्या कर्मचार्‍यांवर अन्याय केला जातो. कर्मचार्‍यांना मानसिक त्रास दिला जातो. शहरामध्ये बसेसची संख्या जास्त नाही. पास केंद्र बंद आहेत. पालिका केवळ त्यांना पैसे देण्याचे काम करते. परंतु, जेवढे पैसे पालिका देते. त्यावढ्या सुविधा शहराला मिळत नाहीत. पीएमपीएल कंपनीवर पालिकेतील तज्ज्ञ संचालकाची निवड करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली.

पीएमपीएमचे शहरात कार्यालय हवे
महासभेच्या विषयपत्रिकेवर पीएमपीएलचा लेखा परिक्षणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. त्यावर बोलताना माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, पीएमपीएमलच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तुट आहे. पीएमपीएमलच्या अनेक बस बंद आहेत. पास केंद्र बंद केली आहेत. पीएमपीएमलची सेवा सक्षम करणे गरजेचे आहे. वाहतूक सेवा चांगली असली पाहिजे. पीएमपीएलकडून पिंपरी-चिंचवड शहरासाठी जोपर्यंत प्रवासी केंद्रीत निर्णय घेतले जात नाहीत. तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवावा. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शहरात पीएमपीएलचे कार्यालय नाही. त्यामुळे पीएमपीएलचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अडचणी येतात. शहरात पीएमपीएमएलचे कार्यालय करण्यात यावे. कर्मचार्‍यांचा प्रश्‍न सोडविण्यात यावा. त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. माई ढोरे म्हणाल्या, पीएमपीएमएलमध्ये शहरातील कर्मचार्‍यांवर अन्याय केला जात आहे. पीसीएमटी सुरु करण्यात यावी.

प्रवाशांना अच्छे दिन कधी येणार?
स्थायीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, पीएमपीएमलच्या 159 कर्मचार्‍यांना व्हॉटसअ‍ॅपवरुन सूचना देऊन कामावरुन कमी केले होते. त्यांना त्यांचे मत मांडण्याचीदेखील संधी दिली नव्हती. तत्कालीन सीएमडी तुकाराम मुंडे यांनी कर्मचार्‍यांवर अन्याय केला. त्यांच्या कारकिर्दीत पीएमपीएलची वाट लागायला सुरुवात झाली होती. आता त्यांच्या जागी आलेल्या नयना गुंडे यांनी कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुन्हा घेण्याची तयारी दर्शविली आहे. सीएमडीचे अधिकार एककलमी आहेत. त्या अधिकारांमुळे आपले मत जाणून घेतले जात नाही. पीएमपीएल कंपनीवर पालिकेतील तज्ज्ञ संचालकाची निवड करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, पीएमपीएलवर कोट्यवधी रुपये खर्च करुन दर्जेदार सुविधा मिळत नाही. प्रवाशांचे अच्छे दिन कधी येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक दत्ता साने, पंकज भालेकर, संदीप वाघेरे, माउली थोरात, सचिन चिखले यांनी भाग घेतला.