वर्ष 2017-18 मध्ये आतापर्यंत 13 बसला आग : देखभाल-दुरूस्तीचा अभाव
पुणे : बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील अनेक महिन्यांपासून केवळ ‘बस फायर ऑडिट’ खेळ खेळला जात आहे.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाकडे 819 डिझेल व 563 सीएनजी अशा एकूण 1,382 स्वमालकीच्या बस आहेत. तर भाडेतत्वावरील 653 बस सीएनजीवरील आहेत. वर्ष 2017-18 मध्ये आतापर्यंत 13 बसला आग लागली आहे. दर महिन्याला एक याप्रमाणे बस जळून खाक होत आहेत. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात. पण हे उपाय तात्कालीक ठरत आहेत. सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्याची घोषणा करण्यात आली होती. पण अद्याप शेकडो बसमध्ये ही यंत्रणाच नाही. आग लागल्यानंतर अद्याप एकाही चालक किंवा वाहनाने या यंत्राचा वापर केलेला नाही. काही महिन्यांपूर्वी बसचे फायर ऑडिट करण्याची घोषणाही आगीच्या धुरात विरून गेली. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेवर (सीआयआरटी) ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. एका खासगी संस्थेकडून हे ऑडिट करून घेण्याचेही नियोजन होते. पण अशी कोणतीही संस्था नसल्याचे समोर आले. एका संस्थेला दिलेले कामही अधिक खर्चामुळे मागे घेण्यात आले. त्यानंतर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेकडून ऑडिट केले जाणार होते. पण तेही मागे पडले.
स्वतंत्र समितीची स्थापना
आता प्रशासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती तरी आगडोंब विझविणार का? हे येत्या काही दिवसात समजेल. पण आतापर्यंत लागलेल्या आगींचे नेमके कारण समजले नसले तरी या आगी देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळेच लागत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसला आग लागण्यापुर्वी पुढील बाजूने धूर येतो. त्यानंतर लगेचच आग लागून संपूर्ण बस पेटते. चालकांच्या प्रसंगावधानामुळे या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण त्यामुळे या घटनांचे महत्त्व कमी होत नाही. बसची योग्य प्रकारे देखभाल नसल्यास केवळ आगच नाही तर कशाही प्रकारे अपघात होण्याची शक्यता आहे. जुन्या बसचे पीएमपीचे कारणही चुकीचे ठरत आहे. चार-पाच वर्षांपूर्वीच्या बसही पेटल्या आहेत.
दरमहा तांत्रिक परिक्षण
बस फायर ऑडिटसाठी पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीमध्ये एआरएआय, सीआयआरटी, आरटीओचे प्रत्येकी एक अधिकारी, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह, अँथनी गॅरेजचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, फायर ऑडिट कन्स्लटंट, पीएमपीचे दोन मुख्य अभियंता, भांडार अधिकारी व देखभाल अभियंता यांचा समावेश आहे. महामंडळाकडील डिझेल व सीएनजी बसचे दरमहा तांत्रिक परीक्षण करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीची बैठक होईल.
भाडेतत्वावरील बसकडे दुर्लक्ष
पीएमपी प्रशासनाने नुकतीच स्थापन केलेली समिती केवळ स्वमालकीच्या बसचेच ऑडिट करणार आहे. पण भाडेतत्वावरील बसबाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. बुधवारी आग लागलेली बस भाडेतत्वावरील होती. या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीवर पीएमपीचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाणही अधिक आहे. तरीही प्रशासन या बसकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. ठेकेदारांना सातत्याने पत्रव्यवहार करून सक्त ताकीद दिल्याचा दावा अधिकारी करतात. पण त्यानंतरही स्थिती सुधारताना दिसत नाही.