नव्या 400 गाड्या आल्यानंतर जुन्या 150 गाड्या बाद : गाड्यांची कमतरता
पुणे : नव्या वर्षात पीएमपीच्या ताफ्यात चारशे गाड्या दाखल होणार आहेत. या गाड्या दाखल होताच प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या 100 ते 150 गाड्या ताफ्यातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ताफ्यात 100 ते 150 गाड्यांची कमतरता जाणवणार असून नव्या गाड्या मिळूनही पीएमपीचे रडगाणे सुरूच राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ ते नऊ लाख प्रवाशांना पीएमपीकडून दैनंदिन प्रवासी सेवा दिली जाते. प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात गाड्या कमी आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार गाड्या आहेत. त्यातील एक हजार गाड्या डिझेलवर, तर उर्वरित एक हजार गाड्या सीएनजीवर चालणार्या आहेत. त्यातील काही गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची संख्या लक्षात घेता ताफ्यात किमान तीन हजार गाड्या असाव्यात, अशी मागणी सातत्याने होते.
पीएमपी धावणार सीएनजीवर
पीएमपीसाठी काही महिन्यांपूर्वी गाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी त्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीएनजीवर चालणार्या 400 गाड्यांसाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या गाड्या पीएमपीला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र नव्या गाड्या ताफ्यात आल्यानंतर आयुर्मान संपलेल्या 100 ते 150 गाड्या बाद केल्या जाणार.
गाड्यांचे आयुर्मान संपले
पीएमपीच्या मालकीच्या गाड्यांचे आयुर्मान संपल्यानंतरही या गाड्या रस्त्यावर धावतात. पीएमपी प्रशासनानेही आयुर्मान संपलेल्या गाड्या मार्गावर असल्याची कबुली दिली आहे. या गाड्यांमुळे शहराच्या प्रदूषणावरही गंभीर परिणाम होत आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या गाड्या दाखल झाल्यानंतर किमान शंभर ते दीडशे गाड्या बाद करण्यात येतील, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गरजेचे 500 इलेक्ट्रीकल गाड्या
शंभर ते दीडशे गाड्या ताफ्यातून बाद केल्या तरी त्याचा संचलनावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच गाड्यांची कमतरताही जाणवणार नाही, असा दावा पीएमपी प्रशानसाकडून करण्यात आला आहे. या गाड्यांबरोबच स्मार्ट सिटी अंतर्गत 500 इलेक्ट्रिकल गाड्या घेण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका त्यासाठी अर्थसाहाय्य करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 150 गाड्या येणार आहेत. या प्रकारच्या गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्या वर्षात त्या उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. वारजे माळवाडी आणि कर्वे रस्ता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी वारजे माळवाडी ते आळंदी हा नवा बसमार्ग सुरू करण्यात आला आहे. कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सिमला ऑफिस, वाकडेवाडी, अॅम्युनिशन फॅक्टरी, विश्रांतवाडी असा बसचा मार्ग राहणार आहे. वारजे माळवाडी येथून सकाळी 6.30, 11, दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजता गाड्या सुटणार असून आळंदी येथून सकाळी 8.30, दुपारी 1, सायंकाळी 5 आणि रात्री 9 वाजता गाड्या सुटणार आहेत.