पीएमपीच्या उत्पन्नात वाढ

0

पुणे । पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) प्रवासी वाहुतकीपासून मिळणार्‍या उत्पन्नात आणि बसने प्रवास करणार्‍या दैनंदिन प्रवाशांच्या संख्येत चालू आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. दैनंदिन उत्पन्नात पावणेसात लाख रुपयांनी तर, प्रवासी संख्येत 50 हजार 811 ने वाढ झाली आहे. यावरून तुकाराम मुंडेे यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून सार्वजनिक बससेवेच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंडे यांनी मार्च 2016 च्या अखेरीस ‘पीएमपी’च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. या वर्षात आतापर्यंत मुंडे यांनी पीएमपीमध्ये बदल करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांचा आढावा त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.

ब्रेकडाउन घटविण्यासाठी उपाययोजना
पीएमपीसाठी ब्रेकडाउन ही खूप मोठा डोकेदुखी होती. गेल्या सहा-आठ महिन्यात ब्रेकडाउन घटविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा परिणाम पीएमपीच्या ताफ्यातील बसच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मार्गावरील बसची सरासरी संख्या 42 ने वाढली आहे. त्यामुळे पीएमपीच्या संचलनातही वाढ झाली आहे. 2016-17 या वर्षात पीएमपी व खासगी ठेकेदारांच्या मिळून सरासरी 1383 बस मार्गावर धावत होत्या. त्याद्वारे दररोज 8 कोटी 21 लाख 38 हजार 326 किलोमीटरचा प्रवास झाला. यंदा दररोज सरासरी 1425 बस मार्गावर धावत असून, 8 कोटी 57 लाख 74 हजार सहा किलोमीटर सेवा दिली जाते, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

18 कोटींनी वाढले उत्पन्न
‘पीएमपी’ला प्रवासी वाहतुकीतून वर्ष 2016-17 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 396 कोटी 38 लाख 96 हजार 493 रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत 414 कोटी 80 लाख 86 हजार 853 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत 18 कोटी 41 लाख 90 हजार 360 रुपये उत्पन्न वाढले आहे. पीएमपीचा आर्थिक तोटा कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे, असे मुंडे यांनी नमूद केले.

300 जण निलंबीत
पीएमपीकडून शहरात प्रवासी केंद्रित आणि दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यांत पीएमपीचे ई-कनेक्ट अ‍ॅप, आयटीएमएस आदी अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. बेशिस्त आणि गैरवर्तन करणार्‍या 300 अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.
-तुकाराम मुंडे, अध्यक्ष, पीएमपी