पेटलेल्या बसबाबत देखभाल-दुरुस्तीत हलगर्जीपणाचा आरोप
पुणे : रामटेकडी परिसरात धावत्या बसने पेट घेतला. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली. मात्र, बसच्या देखभाल दुरुस्तीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी हडपसर डेपोतील दोन कर्मचार्यांवर निलंबन कारवाई करण्यात आली. दोघेही प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आल्याने ही कारवाई केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कात्रज-हडपसर या धावत्या बसने रामटेकडी येथे एसआरपीएफ गेट समोर पेट घेतला. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मार्गावरच ही घटना घडली. बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने होणारी दुर्घटना टळली. मात्र, घटना घडल्याच्या आधी रविवारी रात्री संबंधित बस हडपसर डेपोत सर्व्हिसिंगसाठी आली होती. यावेळी कर्मचार्यांनी बसची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे होते. मात्र, देखभाल दुरुस्तीत निष्काळजीपणा केल्याचे प्राथमिक तपासणीतून दिसून येत आहे. यामुळे संबंधित दोन कर्मचार्यांना आगार व्यवस्थापक यांनी निलंबित केले आहे. तसेच, यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवण्यात आला आहे.