पीएम केअर फंडमध्ये जमा झालेल्या निधीचा हिशोब जाहीर करा: मेधा पाटकर

0

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत ‘पीएम केअर फंडात’ मदत करण्याचे सांगितले होते. देशातील उद्योजक, व्यवसायिक, नागरीकांनी भरघोस प्रतिसाद देत आर्थिक मदत जमा केली होती. पंतप्रधान केअर निधीत जमा झालेल्या पैशांचा हिशोब देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.

‘पीएम केअर फंड’ या
नावाने संकलित झालेला असल्याने व तो सार्वजनिक पैसा असल्याने या निधीचा हिशोब जाणून घेण्याचा हक्क समाजाला आहे. हा निधी श्रमिकांसाठीच वापरला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पीएम केअर फंड, आपत्ती व्यवस्थापन निधी, श्रमिकांसाठीचे वेगवेगळे निधी, तसेच योजनांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी पाटकर यांनी या वेळी केली. संकटाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन निधी हाच मुख्य आधार असतो. मात्र, केंद्र सरकारने अचानक पीएम केअर फंड निर्माण केला. हा फंड सार्वजनिक नसल्याचा दावा सरकार करत आहे. परंतु, पंतप्रधानांच्या नावाने असलेला हा फंड सार्वजनिकच मानला पाहिजे आणि त्यातून श्रमिकांना टाळेबंदीच्या काळात भरपाई आणि निवृत्तीवेतन दिले गेले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावले.